परभणीत धुणी धुताना दोन सख्ख्या बहिणी तळ्यात बुडाल्या; एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर
परभणी, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी गाव शिवारात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत धुणे धुताना दोन सख्ख्या बहिणी तळ्यात बुडाल्या. या दुर्घटनेत एकीचा मृत्यू झाला असून दुसरीची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. सातपूर, नाशिक येथे वास्तव
धुणे धुताना दोन सख्ख्या बहिणी तळ्यात बुडाल्या; एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर


परभणी, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।

जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी गाव शिवारात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत धुणे धुताना दोन सख्ख्या बहिणी तळ्यात बुडाल्या. या दुर्घटनेत एकीचा मृत्यू झाला असून दुसरीची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

सातपूर, नाशिक येथे वास्तव्यास असलेले परमेश्वर बारकिराम चव्हाण हे कुटुंबासह आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी काही दिवसांपूर्वी मूळ गावी, कुऱ्हाडी येथे आले होते. गुरुवारी दुपारी त्यांच्या मुली पूजा परमेश्वर चव्हाण (वय २०) आणि संध्या परमेश्वर चव्हाण (वय १७) या दोघी धुणे धुण्यासाठी गावशेजारील तलावावर गेल्या.

धुणे धुत असताना दोघींचा पाय घसरून त्या तळ्यात पडल्या. शेजारील महिलांनी आरडाओरड केल्यावर गावातील नागरिक तात्काळ धावून आले आणि बचावकार्य सुरू केले. काही वेळानंतर पूजा ही सापडली. तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तिची प्रकृती चिंताजनक असल्याने परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आली.

दरम्यान, संध्या ही तळ्यातील खोल खड्ड्यात अडकल्याने तिचा शोध घेण्यासाठी सुमारे अर्धा तास लागला. अखेर ती सापडल्यावर तिला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. पारवे यांनी तपासून तिला मृत घोषित केले.

या घटनेनंतर कुऱ्हाडी गावात शोककळा पसरली असून नातेवाईकांसह ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे. बातमी देईपर्यंत या प्रकरणी पोलिसांत नोंद प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande