बंगळुरु, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतात दुचाकी निर्मितीसाठी आघाडीची कंपनी म्हणून ओळखल्या जाणा-या एथर एनर्जी लिमिटेड कंपनीने तामिळनाडू राज्यातील आपल्या उत्पादन कारखान्यातून तब्बल पाच लाख इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची निर्मिती केली आहे. एथरची फॅमिली दुचाकी म्हणून मान मिळवलेल्या रिझ्ता या ब्रॅण्डच्या माध्यमातून ही विक्रमी निर्मितीची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी रिझ्ता या ब्रॅण्डचे धुमधडाक्यात अनावरण झाले होते. वर्षभरात हा ब्रँण्ड सर्वात मजबूत विकासाचे इंजिन म्हणून वेगाने उदयास आले आहे. रिझ्ता या ब्रॅण्डच्या माध्यमातून झालेल्या विक्रमी नोंदीमुळे एथर कंपनीच्या विकासाच्या टप्प्यात एका नव्या यशाची नोंद झाली आहे.
या महत्त्वपूर्ण टप्प्याबद्दल एथर एनर्जी लिमिटेड कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य तांत्रिक अधिकारी स्वप्नीन जैन यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘५ लाख स्कूटर्सचा टप्पा पार करणे हे एथरसाचे मोठे यश मानले जाते. आमच्या पहिल्या प्रोटोटाइपपासून आजपर्यंतचा प्रवास हा केवळ वाहने बनवण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. हा प्रवास इलेक्ट्रोनिक दुचाकीच्या निर्मितीतून विश्वासार्ह आणि सातत्यपूर्ण उत्पादन परिसंस्था तयार करण्यापर्यंत विकसित झालेला आहे. अभियांत्रिकी प्रयत्न, सततच्या आव्हानात्मक चाचण्या तसेच उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तेची खातरजमा केल्याने हे यश संपादित करता आले. कंपनीतील प्रत्येक कर्मचा-याच्या समर्पणामुळे तसेच ग्राहकांच्या विश्वास आणि पाठिंब्यामुळे हे शक्य झाले.’’
गेल्या काही वर्षांत एथरने मजबूत कार्यक्षमता असलेल्या आणि कौटुंबिक वापरासाठी आवश्यक असलेल्या दुचाकींची नवनवीन रेंज बाजारात आणली आहे. रिझ्ता हा ब्रँण्ड बाजारात उपलब्ध होताच वर्षभरात ग्राहकांनी त्याला पसंती दर्शवली. एथर कंपनीच्या विकासात रिझ्ताचा मोठे योगदान आहे. कंपनीच्या एकूण उत्पादनात रिझ्ताचे एक-तृतीयांशहून अधिक उत्पादन केले जाते. मेट्रो शहरांसोबत मध्य आणि उत्तर भारतातील टायर २ आणि ३ शहरांतही एथरची मागणी वाढत आहे.
तामिळनाडू राज्यातील होसूर येथे एथ एनर्जी लिमिटेड कंपनीचे दोन उत्पादन युनिट्स कार्यरत आहेत. यापैकी एका युनिटमध्ये दुचाकी निर्मितीच्या साधनांची जुळवाजुळव केली जाते. दुस-या केंद्रात बॅटरीची निर्मिती केली जाते. होसूर उत्पादन केंद्रातील युनिट्समधून दर वर्षाला ४ लाख २० हजार दुचाकींची निर्मिती केली जाते. ग्राहकांकडून इलेक्ट्रीक वाहनांची वाढती मागणी ध्यानात घेत एथरने छत्रपती संभाजीनगर येथील बिडकिन, ऑरिक येथे फॅक्टरी ३.० या नावाने तिसरे उत्पादन प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यांत विकसित केला जाईल. या निर्मितीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. इंडस्ट्री ४.० या तत्वावर या प्रकल्पाची निर्मिती होईल. या विकासानंतर फॅक्टरी ३.० दुचाकी निर्मितीसाठी पूर्णपणे सक्षम होईल. होसूर तसेच छत्रपती संभाजीनगर येथील निर्मिती केंद्रातून दरवर्षाला तब्बल १४ लाख २० हजार इलेक्ट्रिक दुचाकींची निर्मिती केली जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर