परभणी, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात आयोजित केंद्रीय क्रीडा महोत्सवामधील बुद्धिबळ क्रीडा प्रकारात परभणी येथील विद्यार्थिनी दिक्षा रामा पोळ हिने उल्लेखनीय यश मिळवत विभागीय स्तरावरून केंद्रीय स्तरावर निवड मिळवली आहे.
दरवर्षी २५ वर्षाखालील आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाशी संलग्न विद्यार्थ्यांसाठी हा क्रीडा महोत्सव राज्यस्तरावर आयोजित केला जातो. विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र स्पर्धा होत असते. त्यात बुद्धिबळ या बौद्धिक खेळात दिक्षा पोळ हिने उत्तम कामगिरी करत विभागीय स्तरावर विजय मिळवला असून, आता ती नाशिक येथे होणाऱ्या केंद्रीय स्तरावरील स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
दिक्षाच्या या यशाबद्दल मिनी चेस क्लब, परभणी तर्फे तिचा सत्कार करण्यात आला. क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी दिक्षाचे अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशाबद्दल दिक्षाने आपल्या प्रशिक्षक, कुटुंबीय आणि मिनी चेस क्लबचे आभार मानले असून, केंद्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून परभणीचे नाव उज्ज्वल करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis