नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर, (हिं.स.) पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाने डावाने विजय मिळवला होता. आता टीम इंडिया आता दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी पूर्णपणे सज्ज आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मोठ्या विजयानंतर संघाचे मनोबल उंचावले आहे. पण संघ संयोजनापेक्षा क्रिकेटपटूंचा थकवा आणि आगामी व्यस्त क्रिकेट वेळापत्रकावर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. दरम्यान, वेस्ट इंडिज संघ भारतापेक्षा खूपच कमकुवत आहे त्यामुळे भारताला ही कसोटी मालिका 2-0 ने जिंकण्याची नामी संधी आहे.
भारताने २०२३ मध्ये दिल्लीच्या या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. ही खेळपट्टी ऐतिहासिकदृष्ट्या फिरकी गोलंदाजांना पसंती देत आली आहे. ज्यामुळे वेगवान गोलंदाजांना मोठे स्पेल टाकण्याची गरज कमी पडणार आहे. टीम इंडियाने 2003 मध्ये खेळलेल्या सामन्यात तीन फिरकी गोलंदाज आणि दोन वेगवान गोलंदाज खेळवले आणि यावेळीही अशीच फिरकी-भारी रणनीती वापरण्याची शक्यता आहे. भारत पुन्हा एकदा फिरकीपटूंचा त्रिकूट मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.
संघासमोरील सर्वात मोठी समस्या जसप्रीत बुमराहच्या कामाचा ताण आहे. आशिया कप अंतिम फेरीनंतर फक्त तीन दिवसांनी पहिली कसोटी खेळण्याबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. पण त्याने कामगिरीत सातत्य दाखवले आहे. आता त्याला काही दिवसांची विश्रांती देण्यात आली आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत खेळणार नाही. या बाबी लक्षात घेता बुमराह खेळण्याची शक्यता आहे. पण दुखापतीमुळे दीर्घकाळ विश्रांती घेतल्यानंतर त्याचे कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन अतिशय काळजीपूर्वक केले जात आहे. आणि संघ कोणताही धोका पत्करणार नाही.
दुसरा पर्याय म्हणजे मोहम्मद सिराजला विश्रांती देणे. सिराज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचा भाग आहे आणि बुमराह एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळणार नाही. भारताला तिन्ही सामन्यांसाठी सिराजला फिट राहिल याची काळजी घेणे आवश्यक आहे. जर रोटेशन प्लॅन लागू केला गेला आणि कोणत्याही प्रमुख वेगवान गोलंदाजाला विश्रांती दिली गेली. तर तरुण वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळू शकते. जर त्याला संधी मिळाली तर त्याचा हा मायदेशातील पहिलाच कसोटी सामना ठरेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे