नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर, (हिं.स.) - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या दौऱ्यासाठी भारतीय संघातून वगळण्यात आल्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळणार आहे. आधुनिक काळातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या शमीचा या देशांतर्गत स्पर्धेसाठी बंगालच्या १८ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापासून शमी भारतीय संघाबाहेर आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, शमीने भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी पुरेसे देशांतर्गत क्रिकेट खेळलेले नाही. बंगाल संघाबाबत, अभिमन्यू ईश्वरनकडे पुन्हा एकदा संघाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. अभिमन्यू इंडिया अ संघाकडून खेळत असल्यामुळे बंगालसाठी नियमितपणे खेळू शकला नाही. पण, अलीकडे चांगली कामगिरी न करणाऱ्या या मजबूत संघाचे नेतृत्व तो करेल अशी अपेक्षा आहे.
खराब फॉर्म आणि इंडिया अ संघातील वचनबद्धतेमुळे २०२२-२३ हंगामाच्या मध्यात ईश्वरनला बंगालच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले होते. गेल्या तीन वर्षांपासून हा अव्वल क्रमांकाचा फलंदाज भारतीय कसोटी संघासाठी राखीव क्रिकेटपटू आहे. पण अद्याप त्याने पदार्पण केलेले नाही. शमी आणि ईश्वरन व्यतिरिक्त, बंगालच्या संघात प्रतिभावान यष्टीरक्षक-फलंदाज अभिषेक पोरेलचाही समावेश करण्यात आला आहे. गोलंदाजीत, आकाश दीप आणि इशान पोरेल हे वेगवान रणजी ट्रॉफीत चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे.
अनुभवी अनुस्तुप मजुमदार, सुदीप चॅटर्जी आणि तरुण सुदीप कुमार घरामी फलंदाजी क्रमात महत्त्वाची भूमिका बजावतील. राहुल प्रसाद, सौरभ कुमार सिंग आणि विशाल भाटी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील. लक्ष्मी रतन शुक्ला हे मुख्य प्रशिक्षक या संघाचे असणार आहेत. तर अरुप भट्टाचार्य आणि शिव शंकर पॉल सहाय्यक असतील. चरणजीत सिंग मथारू हे संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहेत. बंगाल १५ ऑक्टोबर रोजी ईडन गार्डन्सवर उत्तराखंडविरुद्ध रणजी करंडक मोहिमेची सुरुवात करणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे