इस्लामाबाद , 9 ऑक्टोबर (हिं.स.) ।“पाकिस्तान प्रत्येक हल्ल्याला उत्तर देण्यास सज्ज आहे”, असा इशारा पाकिस्तानी आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी भारताला दिला आहे. याचबरोबर त्यांनी आपल्या लष्कराला सतत सज्ज राहण्याचे आणि तंदुरुस्तीत विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत.ते बुधवारी (८ ऑक्टोबर) रावलपिंडीमधील जनरल हेडक्वार्टरमध्ये कॉन्फरन्स दरम्यान बोलत होते.
मीडिया रेपोर्टनुसार, भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या इशाऱ्यांमुळे पाकिस्तानी लष्करात भीतीचे वातावरण पसरले आहे. बैठकीतही आसिम मुनीरने यावर चिंतेचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी म्हटले, “आम्ही हे स्पष्ट करुन सांगू इच्छितो की कोणत्याही हल्ल्याला त्वरित व आक्रमक पद्धतीने उत्तर दिले जाईल. जर कोणता हल्ला झाला तर आमच्या लष्कराचे उत्तर अधिक तीव्र आणि ठाम असेल.” आसिम मुनीर यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानी आर्मी सगळ्या बाबतीत सक्षम आहे. त्यांनी आपल्या सैनिकांना आरोग्य आणि तंदुरुस्तीवर लक्ष देण्याचेही आवाहन केले.
पुढे कॉन्फरन्समध्ये बोलताना त्यांनी काश्मीरचा मुद्दाही उचलला आणि सांगितले की, पाकिस्तान काश्मिरी लोकांसोबत आहे. त्यांनी गाझाच्या परिस्थितीवरही बोलून त्वरित युद्धविराम आणि तिथल्या लोकांना मानवी मदत पोहोचवण्याची मागणी केली.या बैठकीत कमांडरांनी पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील अलीकडील संरक्षण कराराचेही कौतुक केले आणि म्हटले की हा करार सीमा भागातील सुरक्षा भागीदारी अधिक मजबूत करण्यास आणि परस्पर संरक्षण हितासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode