
बीड, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ व मारहाण केल्याप्रकरणी शिरूर तालुक्यातील रहिवासी असलेल्या आरोपी वडिलांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. घोरपडे यांनी दोषी ठरवून ७ वर्षे सक्षम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणी सरकारी पक्षाकडून अॅड. अनिल तिडके यांनी बाजू मांडली होती.
१६ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ८ वाजता पीडिता जेवण करून घरी बसली होती. आरोपी हा दारू पिऊन घरी आला व विनाकारण मारहाण करू लागला. यामुळे पीडिता ही शेजाऱ्यांकडे झोपायला गेली. काही वेळाने आरोपींनी पीडितेस गोड बोलून घरी झोपायला नेले. पीडिता ही झोपली असता तिची छेड काढली. पीडितेने त्यास बाजूला सरकवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने लाथाबुक्क्याने मारहाण केली. लगट करण्याचा अधिक प्रयत्न करताच पीडितेने आरोपीस बाजूला लोटून दिले व घराच्या बाहेर पळून गेली.
दुसऱ्या दिवशी वडिलांजवळ झोपण्यास मुलीने नकार दिला. त्यामुळे त्याने पुन्हा पीडितेस मारहाण केली. यामुळे पीडिता ही पुन्हा शेजाऱ्यांकडे पळून गेली. दुसऱ्या दिवशी आरोपीने शेजाऱ्यांना माझ्या मुलीला रात्री घरी मुक्काम का करू दिला? असे म्हणत शिवीगाळ केली. या प्रकरणी शिरूर ठाण्यात पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला गेला होता. पीएसआय धनंजय कुलकर्णी यांनी तपास करून दोषारोपपत्र सादर केले होते.
न्या. एस. एस. घोरपडे यांच्यासमोर सुनावणी झाली. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे ६ साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात पीडिता, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचा पुरावा व सहायक सरकारी वकील अॅड. ए. बी. तिडके यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून निकाल दिला गेला. अॅड. तिडके यांना जिल्हा सरकारी वकील अजय राख यांनी मार्गदर्शन केले. पैरवी अधिकारी पोलिस कॉन्स्टेबल सुरेश कदम यांनी काम पाहिले.
----------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis