
परिवर्तन आघाडीकडून परमेश्वर कदम मैदानात
परभणी, 18 नोव्हेंबर, (हिं.स.)। सोनपेठ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांनी भव्य रॅलीसह उमेदवारी अर्ज दाखल केला, तर शहर विकास परिवर्तन आघाडीकडून परमेश्वर कदम यांनीही अर्ज दाखल करत निवडणूक लढतीला रंगत आणली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांची अधिकृत उमेदवारी निश्चित करण्यात आली. सोमवारी राठोड यांनी समर्थकांसह सोनपेठ शहरातून मोठी रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रॅलीदरम्यान शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या वेळी श्रीकांत विटेकर, मदनराव विटेकर, रमाकांत राठोड यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुसरीकडे, शहर विकास परिवर्तन आघाडीमार्फत परमेश्वर कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी माजी आमदार व्यंकटराव कदम उपस्थित राहून त्यांनी उमेदवाराला पाठिंबा दर्शविला. सोनपेठ नगरपालिकेच्या निवडणुकीत या दोन्ही उमेदवारांच्या प्रवेशामुळे लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता स्थानिक राजकारणात व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis