
अमरावती, 18 नोव्हेंबर (हिं.स.) | मागील चोविस तासात शहर, जिल्ह्यासह संपुर्ण विदर्भात तापमानात घट झाली आहे. अमरावती शहरात तर यंदाच्या हंगामातील सर्वात निच्चांकी १०.५ अंश तापमानाची नोंद सोमवारी पहाटे करण्यात आली आहे. मागील चोविस तासात अमरावतीत तब्बल २.२ अंशाने पारा घसरला आहे. याचवेळी शहरापेक्षाही थंडीची हुडहुडी विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यासह मेळघाटात आहे. चिखलदऱ्यात किमान तापमान ८ ते ९ अंशाच्या आसपास असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मागील आठ ते दहा दिवसांपासून तापमानात घट झाल्यामुळे थंडीचा जोर वाढलेला होताच. मात्र रविवारी सायंकाळपासून तर हुडहुडी भरवणारी थंडी जाणवत होती. सोमवारी पहाटे तर थंडीने कहर केला होता. यंदाच्या हंगामातील निच्चांकी तापमान १०.५ अंशाची नोंद झाली आहे. आणखी दोन दिवस थंडी याचप्रकारे राहणार असल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितले आहे. नोव्हेंबर महिन्यातच यंदा जोरदार थंडी पडल्यामुळे सर्वसामान्यांसाठी हा वातावरणीय धक्काच मानल्या जात आहे.कारण मागील पाच ते सहा वर्षांत या काळातील तापमानाच्या नोंदी पाहिल्यास पारा हा १५ ते १६ अंशापर्यंत खाली येतो, यंदा मात्र किमान १२ अंशाच्या आसपास होता, सोमवारी तर पारा थेट १०.५ अंशावर आलेला आहे. या थंडीमुळे दुपारीसुध्दा दुचाकीस्वार ऊब देणारे कपडे वापरताना सोमवारी दिसत होते. शहरापेक्षाही विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यात थंडीने कहर केला.
चिखलदरा आणि मेळघाटात सोमवारी पहाटे तर प्रचंड थंडी जाणवत होती, यंदाच्या हंगामातील आतापर्यंतची सर्वोच्च थंडी सोमवारी असल्याचे चिखलदऱ्यातील स्थानिकांनी सांगितले आहे. त्यामुळे सोमवारी चिखलदऱ्यात पर्यटकांची संख्यासुध्दा प्रचंड रोडावली होती. तसेच सायंकाळी सहा वाजताच चिखलदऱ्यातील मुख्य मार्ग व चौक निर्मनुष्य झाल्यागत स्थिती होती. ज्या ठिकाणी नागरीक दिसत होते, ते ऊबदार कपड्यांसह शेकोट्यांच्या आधारे बसले होते. चिखलदरा येथे शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी