


नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। पाण्याचा कार्यक्षम वापर ही आजच्या जगात अत्यावश्यक बाब आहे.आपल्या देशासाठी पाण्याचा कार्यक्षम वापर अधिक महत्त्वाचा आहे, कारण लोकसंख्येच्या तुलनेत आपले जलस्रोत मर्यादित आहेत. असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. त्या आज नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात बोलत होत्या. तसेच राष्ट्रपतींनी सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार आणि जल संचय-जन भागीदारी पुरस्कार प्रदान केले.
यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, मानवी संस्कृतीची कथा, ही नदीच्या खोऱ्यात, समुद्रकिनाऱ्यांवर आणि विविध जलस्रोतांच्या आसपास स्थायिक झालेल्या समूहांची कहाणी आहे.दरडोई पाण्याची उपलब्धता हे एक मोठे आव्हान आहे. हवामान बदलाचा जलचक्रावर परिणाम होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अशा परिस्थितीत, पाण्याची उपलब्धता आणि पाण्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकार आणि जनतेने एकत्र काम करायला हवे, असे त्या म्हणाल्या.
गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या जल संचय-जन भागीदारी उपक्रमांतर्गत 35 लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचना बांधण्यात आल्या, याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले.चक्राकार जल अर्थव्यवस्था प्रणालीचा अवलंब करून सर्व उद्योग आणि इतर लाभधारक जलस्रोतांचा प्रभावीपणे वापर करू शकतात, असे राष्ट्रपती म्हणाल्या. त्यांनी नमूद केले की, पाणी प्रक्रिया आणि पाण्याचा पुनर्वापर, याबरोबरच, अनेक औद्योगिक समुदायांनी शून्य द्रव विसर्जनाचे उद्दिष्ट गाठले आहे. असे प्रयत्न जलव्यवस्थापन आणि संवर्धनासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्र आणि राज्य सरकारे, जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायती आणि महानगरपालिका यांच्या पातळीवर जलसंवर्धन आणि सातत्यपूर्ण जल व्यवस्थापनाला प्राधान्य देण्यावर राष्ट्रपतींनी भर दिला. असंख्य शैक्षणिक संस्था, नागरिकांचे गट आणि स्वयंसेवी संस्था देखील या दिशेने योगदान देत आहेत, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शेतकरी आणि उद्योजकांनी पाण्याचा कमीतकमी वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी नवोन्मेशी पद्धतींचा अवलंब करावा, असे त्यांनी सुचवले. वैयक्तिकरित्या उत्साहाने योगदान देणारे विवेकी नागरिक देखील जल-समृद्धी मूल्य साखळीतील महत्त्वाचे भागधारक आहेत, असे त्यांनी नमूद केले. प्रभावी जल व्यवस्थापन हे केवळ व्यक्ती, कुटुंब, समाज आणि सरकार यांच्या सहभागातून शक्य आहे, असे त्या म्हणाल्या.
प्रत्येकाने वैयक्तिक आणि सामुहिकरित्या जलसंधारणाबाबत सतत जागरूक रहायला हवे, अशी सूचना त्यांनी केली. आपल्या देशाच्या सार्वजनिक जाणीवेमध्ये पाण्याबद्दल जागरूकता निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जन शक्तीद्वारेच पाण्याची साठवण आणि संवर्धन केले जाऊ शकते, असे त्या म्हणाल्या.पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि पाणी वापराच्या सर्वोत्तम पद्धती अवलंबण्यासाठी प्रवृत्त करणे, हे राष्ट्रीय जल पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule