
मॉस्को, 18 नोव्हेंबर (हिं.स.) : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात 12 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर एका आठवड्याने, भारताच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी दहशतवादाविरुद्ध भारताची ‘शून्य सहनशीलता’ची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. मॉस्कोमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेत बोलताना आज, मंगळवारी जयशंकर म्हणाले, “दहशतवादाचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही, त्याला दुर्लक्षित करता येणार नाही.
याप्रसंगी सुब्रमण्यम जयशंकर यांनी स्पष्ट केले की, जगाने दहशतवादाच्या सर्व प्रकारांना आणि अभिव्यक्तींना शून्य सहनशीलतादाखवणे अत्यावश्यक आहे. “भारताने हे सिद्ध केले आहे की, आपल्या नागरिकांचे दहशतवादापासून संरक्षण करण्याचा हक्क आपल्याला आहे आणि आम्ही तो वापरणार,” असे ते म्हणाले. शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेकीपणाला मुकाबला करण्यासाठी केली गेली होती, हे त्यांनी परिषदेत दाखवून दिले.
दहशतवादाव्यतिरिक्त, जयशंकर यांनी जागतिक आर्थिक अस्थिरतेवरही चिंता व्यक्त केली आणि पुरवठा साखळीतील धोक्यांचा सामना करण्यासाठी उपाय सुचवले. “आर्थिक संबंधांचे धोके कमी करणे आणि विविधता आणणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. यासाठी सदस्य राष्ट्रांमध्ये न्यायपूर्ण आणि पारदर्शक आर्थिक संबंध प्रस्थापित करणे महत्त्वाचे आहे. त्यांनी भारताच्या मुक्त व्यापार कराराच्या प्रयत्नांची माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्तावित केलेल्या ‘सांस्कृतिक संवाद मंच’चा उल्लेख करत जयशंकर यांनी सदस्य राष्ट्रांमधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांना महत्त्व दिले. यामुळे लोकांमध्ये परस्पर समंजसपणा वाढवण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
याप्रतिआत, सोमवारी जयशंकर यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांची मॉस्कोमध्ये भेट घेतली, आणि रशियन सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाई पाट्रुशेव यांनी दिल्लीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चाही केली. या भेटी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत, कारण राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची 4-5 डिसेंबरला भारत भेट अपेक्षित आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी