
इस्लामाबाद , 19 नोव्हेंबर (हिं.स.)। दिल्लीतील लाल किल्ला स्फोटानंतर पाकिस्तानकडून दररोज नवे-नवे विधान केले जात आहेत. आता पाकव्याप्त काश्मीरचे (पीओके) माजी पंतप्रधान चौधरी अनवारुल हक यांनी कबूल केले आहे की त्यांच्या देशात लपलेले दहशतवादी लाल किल्ल्यापासून ते काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारतावर हल्ले करत आहेत. हक यांचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आपल्या भाषणात हक यांनी बलुचिस्तानचा देखील उल्लेख केला आहे.
हक यांच्या वक्तव्यामध्ये 10 नोव्हेंबरला लाल किल्ल्याजवळ झालेल्या त्या भयंकर स्फोटाचाही उल्लेख होता ज्यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला. व्हायरल व्हिडिओमध्ये ते म्हणताना ऐकू येतात,“मी माझ्या पदाचा योग्य वापर केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना धडा शिकवला की जर बलुचिस्तानात रक्तपात थांबवला नाही, तर आम्ही लाल किल्ल्यापासून ते काश्मीरच्या जंगलांपर्यंत घुसून मारू. अल्लाहच्या कर्माने आम्ही हे करून दाखवले आहे आणि आज ते अजूनही मृतांची मोजणी करत आहेत.”
यापुढे ते म्हणतात,“काही दिवसांनी शस्त्रांनी सज्ज शाहीन आत घुसले आणि त्यांनी हल्ला केला. आजदेखील ते मृतांचे आकडे मोजत बसले आहेत.” हक यांनी काश्मीरच्या जंगलांचा उल्लेख एप्रिलमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी केला आहे. आपल्या संपूर्ण भाषणात त्यांनी दहशतवाद्यांना ‘शाहीन’ असे संबोधले आहे.दिल्लीतील स्फोटामागे जैश-ए-मोहम्मदशी संबंधित एका गटाचा हात असल्याचा संशय आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) च्या माहितीनुसार हा आत्मघाती हल्ला होता आणि फरीदाबादमधून त्याचे नियोजन करण्यात आले होते. हा हल्ला डॉ. उमर नबी यांनी केला होता.
हक यांचे हे कबूलनामा पहिल्यांदाच समोर आलेले नाही. यापूर्वीही असेच धक्कादायक दावे पाकिस्तानमधून केले गेले आहेत. अलीकडेच खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल अफरीदी यांनी पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप केले. अफगाणिस्तान न्यूजच्या अहवालानुसार त्यांनी म्हटले होते की, सरकार स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी ‘बनावट’ दहशतवादी हल्ले घडवून आणते. त्यांनी हा देखील आरोप केला की सरकारने सीमावर्ती प्रांतातील शांतता प्रक्रियेत अडथळे निर्माण केले आणि स्वतःच्या फायद्यासाठी ‘दहशतवाद’ तयार केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode