
नाशिक, 4 नोव्हेंबर (हिं.स.)हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथील महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र या चार दिवसीय रणजी ट्रॉफीच्या सामन्यात खराब हवामानाचा फटका बसून एकूण १२ सत्रातील जवळपास ७ पूर्ण सत्रे इतका वेळ वाया गेल्याने दोन्ही संघांचा पहिला डाव देखील पूर्ण न होता सामना अपेक्षेप्रमाणे अनिर्णित अवस्थेत संपला.
हार्विक देसाई १३२, जय गोहिल ११५ व अर्पित वसावडा नाबाद ७३ यांच्या फलंदाजीच्या जोरावर सौराष्ट्रने आपल्या पहिल्या डावात १०१ षटकांत ५ बाद ३९४ धावा केल्या. तर महाराष्ट्राच्या १० षटकांत १ बाद ५५ धावा झाल्या.आज चौथ्या दिवशी सकाळी सौराष्ट्रने १ बाद १६५ वरून आपला डाव पुढे चालू केला. कालचे नाबाद फलंदाज हार्विक देसाई व जय गोहिलने आपापले शतक पूर्ण केले. पहिल्या सत्रात १०० मिनिटांच्या खेळानंतर जलदगती प्रदीप दाढेने जय गोहिलला ११५ धावांवर पायचीत केले व संघाला आजचे पहिले यश मिळवून दिले. हार्विक देसाई व जय गोहिल यांनी दुसऱ्या गड्यासाठी २३६ धावांची मोठी भागीदारी केली व सौराष्ट्रला लवकर बाद करण्याच्या महाराष्ट्राच्या मनसुब्यांवर पाणी फिरवले. त्यानंतर विकी ओस्तवालने हार्विक देसाईला १३२ धावांवर त्रिफळाचीत केले. जलज शर्माने प्रेरक मंकडला उपहाराच्या ठोक्यास बाद केल्याने उपाहारास सौराष्ट्रच्या ४ बाद ३०३ धावा झाल्या. उपाहारानंतर अजून ९१ धावांची भर घालून सौराष्ट्रने आपल्या पहिला डाव ५ बाद ३९४ वर घोषित केला. महाराष्ट्राच्या मुकेश चौधरीने २ तर प्रदीप दाढे, विकी ओस्तवाल व जलज सक्सेना यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
त्यानंतर चहापानापर्यंत १० षटकात अर्शिन कुलकर्णीच्या तडाखेबंद २८ चेंडूतील ३८ धावांच्या जोरावर महाराष्ट्राने १० षटकांत १ बाद ५५ धावा केल्या. पृथ्वी शॉ हितेन कानबीच्या उसळत्या चेंडूवर फाईन लेग सीमारेषेवर २० धावांवर बाद झाला. पाऊस सुरु झाल्याने चहापान थोडे आधीच घेण्यात आले. शेवटच्या दोन तासांत सामन्याच्या निर्णयाची काहीही शक्यता नसल्याने दोन्ही कर्णधार व पंचांनी सामना थांबविण्याचा निर्णय घेतला.
हार्विक देसाईला त्याच्या १३२ धावांसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे सामना धिकारी , दोन्ही पंच व कर्णधार यांना स्मरण चिन्ह देऊन गौरविण्यात आले. येत्या मार्च महिन्यात सेवानिवृत्त होणारे व नाशिकच्या बहुतेक सर्व रणजी सामन्यात व्हिडीओ विश्लेषक हि जबाबदारी पार पाडणारे बी सी सी आय चे सदानंद प्रधान यांचाही खास सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी चेअरमन ॲडव्होकेट विलासभाऊ लोणारी, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन विनोद शहा, सेक्रेटरी समीर रकटे आणि इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या छोट्याशा आटोपशीर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सेक्रेटरी समीर रकटे यांनी केले व सर्वांचे उत्तम सह कार्याबद्दल आभार मानले. सामनावीर हार्विक देसाई व चौथ्या दिवशीच्या खेळातील इतर छायाचित्रे व चित्रफिती सोबत पाठवत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV