
पुणे, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। पुण्यात मध्यवर्ती बाजीराव रोडवर, जेथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, अशा ठिकाणी एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना दुपारच्या सुमारास घडली असता, जेव्हा रस्त्यावर अनेक जण फिरत होते, तरीही आरोपीने शस्त्राने वार केले आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. मयंक खराडे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. आंबील ओढा येथे तो राहत होता, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला पकडण्यासाठी शोध मोहीम चालू केली आहे, ज्यामुळे पुण्यातील गुन्हेगारीला नव्याने आव्हान मिळाले आहे.
काही दिवसांपूर्वी कोंढवा परिसरात देखील भर दुपारी गणेश काळे याची हत्या करण्यात आली. त्यामुळे पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आज दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील बाजीराव रोडवरील महाराणा प्रताप उद्यानाजवळ, दखनी मिसळच्या समोर ही धक्कादायक घटना घडली. अभिजीत इंगळे आणि त्याचा मित्र मयंक खराडे हे दुचाकीवरून जात असताना, जनता वसाहतीतील तीन मास्कधारी तरुणांनी पाठीमागून अचानक हल्ला केला. या तरुणांनी धारदार शस्त्राने मयंक खराडे याच्या डोक्यात आणि तोंडावर वार केले, ज्यामुळे मयंकचा जागीच मृत्यू झाला. अभिजीत इंगळे सुदैवी बचावला, परंतु तो धक्क्यात आहे. हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. कोंढवा पोलिस ठाण्यात गणेश काळे यांच्या वडिलांनी आंदेकर टोळीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. १ नोव्हेंबर रोजी कोंढवा परिसरात गणेश काळे याची हत्या झाली. पोलिस तपासात या हत्येचा थेट संबंध आंदेकर टोळीशी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु