
परभणी, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। पाथरी तालुक्यातील बाबुलतार येथे बाजरीच्या वादातून एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध अ.जा.अ.ज. अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह बी.एन.एस. अंतर्गत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक केली आहे.
फिर्यादी अंगद नामदेव गालफाडे (३०, रा. बाबुलतार, जि. परभणी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी काही जणांकडून बाजरी विकत घेतली होती. मात्र, ती खराब असल्याने पैसे परत देण्याची मागणी करण्यासाठी ते संबंधितांच्या घरी गेले असता, रघुनाथ साहेबराव पाते यांनी जातीवाचक शिवीगाळ करून लोखंडी रॉडने डोक्यावर प्रहार केला. त्यानंतर अमृत रघुनाथ पाते यांनी काठीने मारहाण केली तर संजीवनी रघुनाथ पाते यांनी मारहाण केली. या सर्वांनी फिर्यादीस जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या घटनेत फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
वैद्यकीय जबाब आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दीपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. घटनेनंतर पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी तत्काळ गावाला भेट देत सर्व समाजघटकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. गावकऱ्यांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावात शांतता कायम ठेवली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis