
मिर्झापूर, 05 नोव्हेंबर (हिं.स.) : उत्तर प्रदेशच्या चुनार रेल्वे स्थानकावर आज, बुधवारी हावडा–कालका मेलच्या धडकेत 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातग्रस्त लोक रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना . ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला असून त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाला जबाबदार ठरवले आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार आज, बुधवारी सकाळी सुमारे 9.15 वाजेच्या सुमारास सोनभद्रकडून येणारी गोमो–प्रयागराज बरवाडीह पॅसेंजर ट्रेन चुनार स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर पोहोचली. या ट्रेनमधील भाविक कार्तिक पौर्णिमेच्या स्नानासाठी चुनार येथे आले होते. फलाटावर उतरल्यावर ते विरुद्ध दिशेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 च्या दिशेने जाण्यासाठी रेल्वे लाइन ओलांडू लागले. त्याचवेळी मुख्य मार्गावरून येणाऱ्या कालका मेलची धडक बसली. या भीषण अपघातानंतर स्थानकावर गोंधळ आणि आरडाओरड सुरू झाली. जीआरपी आणि आरपीएफ अधिकारी मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न करत आहेत.रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 13309 चोपन–प्रयागराज एक्सप्रेस चुनार स्थानकाच्या फलाट क्रमांक 4 रवर आली होती. काही प्रवासी चुकीच्या बाजूने उतरले आणि मुख्य ट्रॅक ओलांडू लागले, जरी फुटओव्हर ब्रिज उपलब्ध होता. त्याच वेळी मुख्य लाईनवरून ट्रेन क्रमांक 12311 नेताजी एक्सप्रेस जात होती, ज्याच्या धडकेत काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी