भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा अचानक राजीनामा
रत्नागिरी, 5 नोव्हेंबर, (हिं. स.) : भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चिपळूण येथे झालेल्या भाजपच्या एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे राजीनामा सादर केला. भाजपमध्ये दक्षि
राजेश सावंत शिवानी माने


रत्नागिरी, 5 नोव्हेंबर, (हिं. स.) : भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चिपळूण येथे झालेल्या भाजपच्या एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे राजीनामा सादर केला.

भाजपमध्ये दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी सावंत यांच्याकडे होती. मात्र नगरपालिका निवडणुका तोंडावर असताना त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या कन्येसाठी त्यांनी राजकीय कारकीर्द धोक्यात घातली का, हा प्रश्न सध्या मतदारसंघात चर्चेचा विषय ठरला आहे. राजेश सावंत यांची कन्या शिवानी ही शिवसेना (ठाकरे गट) उपनेते बाळ माने यांची सून आहे. आगामी पालिका निवडणुकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी ती इच्छुक आहे. ठाकरे गटामध्ये तिचे नाव नगराध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे.

वडिलांनी पक्षनिष्ठा बाजूला ठेवून लेकीच्या राजकीय आकांक्षांसाठी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे. सावंत आणि माने हे व्याही असल्याने त्यांच्यातील कौटुंबिक संबंधामुळे राजकीय समीकरणे निर्माण झाली आहेत.

विधानसभा निवडणुकीच्यावेळीदेखील भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या राजेश सावंत यांनी आपले व्याही बाळ माने यांना मदत केली होती, अशी चर्चा त्या वेळी रंगली होती.

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी शिवानी माने यांना मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राजेश सावंत यांनी भाजपवर कोणताही ‘हितसंबंधांचा संघर्ष’ होऊ नये म्हणूनच राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande