
पुणे, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। ज्येष्ठ इतिहास संशोधक व शिवचरित्रकार गजानन भास्कर तथा गजाभाऊ मेहेंदळे यांचे 17 सप्टेंबर 2025 रोजी अकस्मात दुःखद निधन झाले. गजाभाऊंच्या स्मृती संकल्प सभेचे येत्या रविवारी (9 नोव्हेंबर) सायं. 5.30 वा. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फीथिएटरमध्ये आयोजन केलेले असून या सभेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह कृष्णगोपालजी आणि इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्चचे अध्यक्ष रघुवेंद्र तंवर उपस्थित राहणार असल्याची माहिती भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार प्रदीप रावत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी मंडळाचे चिटणीस पांडुरंग बलकवडे व खजिनदार नंदकुमार निकम उपस्थित होते.
यावेळी अधिक माहिती देतांना रावत यांनी सांगितले की, भारत इतिहास संशोधक मंडळात गजाभाऊंच्या नावाने गजानन मेहेंदळे मराठा इतिहास अध्यासन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे, यामध्ये मराठा साम्राज्यातील शस्त्रास्त्रे, युध्दकौशल्य आणि दस्तऐवज यांची सर्व माहिती उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच इतिहास संशोधन करणाऱ्यांसाठी शिष्यवृत्ती देखील देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात गजाभाऊंनी लिहिलेल्या तीन ग्रंथांचे (छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदू, मुसलमान आणि ख्रिस्ती सेवक, शिवाजी हीज लाईफ अँड टाईम्स व टिपू ॲज ही रिअली वॉज) पुनःप्रकाशन केले जाणार आहे. नजीकच्या काळात त्यांनी संशोधित करून ठेवलेल्या अत्यंत महत्वाच्या ऐतिहासिक साहित्याच्या प्रकाशनाचा संकल्प देखील यावेळी केला जाणार आहे. तसेच त्यांच्या अप्रकाशित साहित्याचे, पुस्तकांचे देखील लवकरच प्रकाशन केले जाणार आहे. दरमहा किमान एक नवे पुस्तक प्रकाशित केले जाईल अशी योजना आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांची विविध पुस्तके सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
गजानन मेहेंदळे यांनी युद्धशास्त्र या विषयाचा सखोल अभ्यास केला होता. 1971 च्या बांगलादेश युद्धातही त्यांनी युद्ध वार्ताहर म्हणून काम केले होते. शिवचरित्र, आदिलशाही फर्माने, शिवरायांचे आरमार, टिपू सुलतान, इस्लाम तसेच अन्य विषयांवर त्यांनी विस्तृत व सप्रमाण लेखन केले आहे. इतिहास विषयाचा चालता बोलता कोश अशीच गजानन मेहेंदळे यांची ओळख होती. अशा अनंत आठवणींना या स्मृती संकल्प सभेमध्ये उजाळा मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु