
पुणे, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्यातील पाचवी आणि आठवी इयत्तांसह चौथी आणि सातवी या इयत्तांसाठीही यंदा शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार चौथी आणि सातवीच्या परीक्षांसाठीचा अभ्यासक्रम राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केला असून, या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मकतेकरिता प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात येते. पूर्वी ही परीक्षा चौथी आणि सातवी या इयत्तांसाठी घेतली जात होती. मात्र, शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) तरतुदी लक्षात घेऊन २०१६-१७ पासून ही परीक्षा पाचवी आणि आठवी या वर्गांसाठी लागू करण्यात आली. पाचवी आणि आठवीला शिष्यवृत्ती परीक्षा लागू केल्यापासून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिक्षण विभागाने पूर्वीप्रमाणेच चौथी आणि सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा लागू करण्याचा निर्णय घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु