
सोलापूर, 6 नोव्हेंबर, (हिं.स.)। प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेचा पहिला हप्ता घेऊनही बांधकाम सुरू न केलेल्या जिल्ह्यातील 60 हजार लाभार्थ्यांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाने नोटीस पाठविली होती. त्यानंतर आता अकरा हजार लाभार्थ्यांनी घरकूल बांधकाम पुन्हा सुरू केले आहे. तर नोटिसीनंतरही 59 हजार लाभार्थी बांधकामाकडे दुर्लक्ष करीत आहेत.
प्रधानमंत्री घरकूल आवास योजना अंतर्गत जिल्ह्यात एक लाख 16 हजार 47 घरकुले मंजूर आहेत. त्यातील 90 हजार 169 लाभार्थ्यांना घरकुलांचा पहिला हप्ता म्हणजेच 15 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. हप्ता जमा केल्यानंतर फक्त 30 हजार लाभार्थ्यांनी घरकुलांची कामे सुरू केली होती.
त्यामुळे उर्वरित 60 हजार लाभार्थ्यांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाने नोटीस देऊन घरकुलांचे बांधकाम सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 11 हजार लाभार्थ्यांनी घरकुलांची कामे सुरू केली असून अद्यापही 49 हजार लाभार्थी घरकुलांची कामे सुरू केली नाहीत. त्यामुळे त्या लाभार्थ्यांना आता दुसरी नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाने दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड