अमरावती : गोडबोले स्मृती सेवा प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी प्रज्ञा प्रबोधिनीची निवड
अमरावती, 7 नोव्हेंबर (हिं.स.) : विदर्भातील सुपरिचित व्यक्तिमत्व तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सेवेसाठी नावलौकीक प्राप्त असे डॉ. रमेशपंत गोडबोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी यावर्षी येथील प्रज्ञा प्रबोधिनीची निवड
गोडबोले स्मृती सेवा प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी प्रज्ञा प्रबोधिनीची निवड जितेंद्रनाथ महाराजांच्या हस्ते 23 नोव्हेंबरला केले जाणार वितरण‎


अमरावती, 7 नोव्हेंबर (हिं.स.) : विदर्भातील सुपरिचित व्यक्तिमत्व तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सेवेसाठी नावलौकीक प्राप्त असे डॉ. रमेशपंत गोडबोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी यावर्षी येथील प्रज्ञा प्रबोधिनीची निवड करण्यात आल्याची माहिती आयोजक संस्थेच्या विश्वस्तांनी आज, गुरुवारी येथे माध्यमांना दिली.श्रमिक पत्रकार भवनात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना उपाध्यक्ष मोहन काटे म्हणाले, यावर्षीच्या पुरस्काराचे वितरण रविवारी २३ नोव्हेंबर रोजी, स्थानिक श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या स्व. सोमेश्वर पुसतकर सभागृहामध्ये सायंकाळी ५ वाजता प.पू. आचार्य जितेंद्रनाथ महाराजांच्या शुभहस्ते केले जाणार आहे. पुरस्काराचे स्वरुप १ लाख रुपयांची गौरव राशी, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे आहे.

मागील वर्षीचा पुरस्कार संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पीटला देण्यात आला होता. तर यावर्षीचा पुरस्कार अमरावती येथील सेवा प्रकल्प प्रज्ञा प्रबोधिनीला देण्याचे निवड समितीने एकमताने ठरविले आहे. प्रज्ञा प्रबोधिनी ही संस्था अमरावती जिल्ह्यातील पारधी समाजासाठी मागील २२ वर्षापासून सेवा कार्य करते आहे. पुरस्कारासाठी निवड करताना संबंधित व्यक्ती अथवा संस्थेला तशी निकड असावी, हे आवर्जून पाहिले जात असून त्या व्यक्ती किंवा संस्थेचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचले जावे, हा उद्देश बाळगला जातो, हेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी डॉ. रमेश गोडबोले स्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मोहन काटे, सहसचिव सोपान गोडबोले, विश्वस्त अतुल गायगोले, अनंत कौलगीकर, अभय देव आदी उपस्थित होते.

डॉ. रमेशपंत गोडबोले हे येथील जगप्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष होते. वैद्यकीय क्षेत्रासह ते आध्यात्मिक प्रांतही जपायचे. त्यांची किर्तने ही अजरामर झाली आहेत. त्यांनी झिरी येथील श्री दत्त मंदिर, बडनेरा जुन्या वस्तीतील श्रीराम मंदिर, अंबापेठमधील श्री गोपाळकृष्ण मंदिर, श्री अंबादेवी मंदिर, श्री एकवीरा देवी मंदिरात कीर्तन सेवा दिली आहे. बडनेरा येथील जुन्या वस्तीतील त्यांचे रुग्णालयात समाजातील सर्व स्तरातील रुग्णांना उत्तम वैद्यकीय उपचार मिळायचे. त्यांनी तहहयात अत्यल्प दरात रुग्णसेवा केली. त्यांच्या प्रदीर्घ वैद्यकीय कारकिर्दित त्यांचा देशभरातील अनेक तज्ज्ञांशी निकटचा संपर्क होता. बडनेरा येथे त्यांच्या पुढाकारानेच अद्ययावत अशी संत गाडगेबाबा रक्तपेढी सुरु करण्यात आली आहे. या रक्तपेढीद्वारे रुग्णांना गुणवत्तेच्या सर्व पातळ्यांवर उत्तम सेवा देणे अविरत सुरु आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande