
अमरावती, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे येथे दि. 19 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सव घेण्यात येणार आहे. महोत्सवात श्रीमती विमलाबाई देशमुख सभागृह, डी. एड. कॉलेज आणि शिवाजी विज्ञान महाविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
सदर युवा महोत्सव हा सांस्कृतिक आणि नवोपक्रम या संकल्पनेवर आधारीत असणार आहे. या महोत्सवात अमरावती जिल्ह्यातील युवक-युवती विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतील. यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात किंवाamravatidso@gmail.comया मेलवर पाठवावे लागतील. तसेचmybharat.gov.inया संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे.
सांस्कृतिक स्पर्धेतील लोकगीत आणि लोकनृत्यात 10 जणांना सहभाग घेता येईल. लोकनृत्यासाठी रेकॉर्ड केलेले संगीत वापरण्यास परवानगी नाही. कौशल्य विकास स्पर्धेत कथालेखन (मराठी, हिंदी व इंग्रजी, 1000 शब्दांत - सहभागी संख्या 3), चित्रकला (सहभागी संख्या 2), वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी - सहभागी संख्या 2) आणि कविता (सहभागी संख्या 3) सहभागी घेता येणार आहे.
चित्रकला स्पर्धेसाठी नशामुक्त युवा, युवकांसाठी आरोग्यदायी जीवनशैली, तर वक्तृत्व स्पर्धेत भारतातील आणीबाणीचा काळ आणि संविधानाचे उल्लंघन, लोकशाही व लोकशाही मुल्यांचे संरक्षण हे विषय आहेत. नवोपक्रम ट्रॅक विज्ञान प्रदर्शनात युवक आणि विद्यार्थ्यांना त्यांचे अभिनव विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रकल्प सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त विकसित भारत चॅलेंज ट्रॅक, डिझाईन फॉर भारत आणि हॅक ऑफ सोशल कॉज यावर आधारित उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
युवा महोत्सवात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी वयोमर्यादा ही 15 ते 29 वर्षांपर्यंत राहणार असून दि. 12 जानेवारी 2026 रोजी वयाची गणना करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 15 नोव्हेंबर आहे. स्पर्धक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विहित नमुन्यातील इंग्रजीमध्ये ओळखपत्र, आधारकार्ड आणि जन्म तारखेचा दाखला, ही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, तपोवन चौक विद्यापीठासमोर, मार्डी रोड, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत.महोत्सवात प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या युवक-युवतींची निवड विभागस्तरीय युवा महोत्सवासाठी आणि त्यानंतर राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी केली जाईल. युवा महोत्सवात युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी