
लासलगाव, 8 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतातून कांद्याची निर्यात होत नसल्याने शेजारील बांगलादेशात प्रचंड खळबळ उडाली आहे. तेथील बाजारपेठांमध्ये कांद्याच्या भावात झपाट्याने वाढ होत असून, सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरात त्याचा थेट परिणाम झाला आहे. भारत हा बांगलादेशाला सर्वाधिक कांदा पुरवठा करणारा देश असल्याने निर्यातबंदीचा सर्वाधिक फटका या देशाला बसला आहे भारताने देशांतर्गत बाजारातील पुरवठा आणि दर नियंत्रणासाठी तात्पुरत्ती निर्यातबंदी लागू केली आहे. यामुळे बांगलादेशात कांद्याची कमतरता निर्माण झाली. दरवाढ इतकी तीव्र आहे की, एक किलो कांद्याची किंमत आता दोनशे ते दोनशे पन्नास बांगलादेशी टाका इतकी झाली आहे.
भारताने निर्यातबंदी लागू केल्यानंतर बांगलादेशी बाजारात तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या दरवाढीमुळे तेथील सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघराचा खर्च प्रचंड वाढला असून, गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थिक ताण आला आहे. काही व्यापाऱ्यांच्या साठेबाजीमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. राजशाही यांसारख्या प्रमुख शहरांतील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर साठेबाजी सुरू झाली आहे. व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर आणखी वाढवण्यासाठी कृत्रिम टंचाई निर्माण केल्याचा आरोप ग्राहक संघटनांनी केला आहे. भारतात दर स्थिर झाल्यानंतरच निर्यात निर्णयाचा पुनर्विचार बाजारातील तपासणीसाठी सरकारने विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, नागरिकांनी सोशल मीडियावरून सरकारविरुद्ध नाराजी व्यक्त करत कांद्याशिवाय जेवण अशक्य अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. बांगलादेश सरकारने भारताशी राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू केली असून, भारताने निर्यात पुन्हा सुरू करावी, अशी अधिकृत मागणी करण्यात आली आहे. मात्र, भारत सरकारने स्पष्ट केले आहे की देशातील सणासुदीच्या काळातील पुरवठा आणि भाव स्थिर झाल्यानंतरच निर्यातीचा निर्णय पुनर्विचारात घेतला जाईल. दरम्यान, बांगलादेश सरकारने म्यानमार, चीन आणि पाकिस्तान या देशांकडून कांदा आयात करण्याचा तातडीचा पर्याय तपासण्यास सुरुवात केली आहे. दरवाढीमुळे बांगलादेशातील छोट्या खानावळी, हॉटेल्स आणि घरगुती स्वयंपाकावरही परिणाम झाला आहे. अनेक लहान दुकानदारांनी दरवाढीमुळे कांद्याचा साठा कमी केला आहे. काही भागात ग्राहकांनी दरवाढीविरोधात निदर्शने केली असून, कांदा ही आता मौल्यवान वस्तू झाली अशा टीका होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV