मुंबई बनले आशियातील सर्वात आनंदी शहर
मुंबई, 08 नोव्हेंबर (हिं.स.) : टाईम राऊटच्या सिटी लाइफ इंडेक्स 2025 या सर्वोक्षणाच्या अहवालानुसार मुंबईला आशिया खंडातील सर्वात आनंदी शहर घोषित करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांच्या जीवनमान, संस्कृती आणि सकारात्मकतेचे प्रतीक म्हणून ही निवड मानली
सीएसटी स्टेशन मुंबई


मुंबई, 08 नोव्हेंबर (हिं.स.) : टाईम राऊटच्या सिटी लाइफ इंडेक्स 2025 या सर्वोक्षणाच्या अहवालानुसार मुंबईला आशिया खंडातील सर्वात आनंदी शहर घोषित करण्यात आले आहे.

शहरातील नागरिकांच्या जीवनमान, संस्कृती आणि सकारात्मकतेचे प्रतीक म्हणून ही निवड मानली जात आहे.

टाईम राऊटच्या सिटी लाइफ इंडेक्स 2025च्या सर्वेक्षणात जगभरातील 18 हजारांहून अधिक लोकांचा सहभाग होता. या सर्वेक्षणात लोकांना त्यांच्या शहरांतील संस्कृती, नाईटलाइफ, खाद्यसंस्कृती, जीवनशैली आणि आनंदाच्या पातळीबाबत मत विचारले गेले होते. मुंबईच्या 94 टक्के नागरिकांनी सांगितले की त्यांचे शहर त्यांना आनंदी ठेवते. तसेच 89 टक्के लोकांनी असे मत नोंदवले की ते इतर कुठेही राहण्यापेक्षा मुंबईत अधिक आनंदी आहेत, तर 88 टक्के लोकांनी म्हटले की मुंबईकर साधारणपणे आनंदी आहेत. त्याचप्रमाणे 87 टक्के उत्तरदात्यांच्या मते गेल्या काही वर्षांत शहरातील आनंदाचे प्रमाण वाढले आहे.

या यादीत चीनचे बीजिंग आणि शांघाय अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. बीजिंगमधील 93 टक्के आणि शांघायमधील 92 टक्के लोकांनी आपले शहर आनंददायी असल्याचे सांगितले. सुरक्षा, सोयी, जीवनशैली आणि संस्कृती या बाबतीत या दोन्ही शहरांना उच्च गुण मिळाले आहेत.

थायलंडचे चियांग माई आणि व्हिएतनामची हनोई ही शहरे पहिल्या पाचांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली. या शहरांतील 88 टक्के लोकांनी सांगितले की त्यांचे शहर त्यांना आनंदी ठेवते. हिरवीगार ठिकाणे, शांत जीवनशैली आणि एकत्रित समाजव्यवस्था ही या शहरांची वैशिष्ट्ये मानली गेली आहेत.

आशियातील सर्वाधिक आनंदी 10 शहरे

१. मुंबई (भारत)

२. बीजिंग (चीन)

३. शांघाय (चीन)

४. चियांग माई (थायलंड)

५. हनोई (व्हिएतनाम)

६. जकार्ता (इंडोनेशिया)

७. हाँगकाँग

८. बँकॉक (थायलंड)

९. सिंगापूर

१०. सोल (दक्षिण कोरिया)

या सर्व शहरांमध्ये एक समान धागा दिसतो समुदायाची मजबूत भावना आणि दैनंदिन जीवनातील समाधान. हेच दाखवते की आनंद हा केवळ सोयी-सुविधांवर नाही तर मानवी नातेसंबंध आणि एकात्मतेच्या भावनेवरही अवलंबून असतो.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande