
नवी दिल्ली, ८ नोव्हेंबर (हिं.स.). हॉकी इंडियाने २३ ते ३० नोव्हेंबर दरम्यान मलेशियातील इपोह येथे होणाऱ्या ३१ व्या सुलतान अझलन शाह कप २०२५ साठी भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा केली.
या प्रतिष्ठित निमंत्रण स्पर्धेसाठी संजयला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. भारताचा पहिला सामना २३ नोव्हेंबर रोजी कोरियाविरुद्ध, त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी बेल्जियमविरुद्ध होईल. त्यानंतर, मेन इन ब्लू संघ २६ नोव्हेंबर रोजी यजमान मलेशियाविरुद्ध, २७ नोव्हेंबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध आणि २९ नोव्हेंबर रोजी कॅनडाविरुद्ध त्यांचा शेवटचा लीग स्टेज सामना खेळेल.ही स्पर्धा राउंड-रॉबिन पद्धतीने खेळवली जाणार आहे. ज्यामध्ये अव्वल दोन संघ ३० नोव्हेंबर रोजी अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.
भारताने शेवटचा २०१० मध्ये सुलतान अझलन शाह कप जिंकला होता आणि २०१९ मध्ये उपविजेता ठरला होता. मजबूत संघ आणि जोरदार तयारीसह, मेन इन ब्लू संघ इपोहमध्ये हे प्रतिष्ठित विजेतेपद परत मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.
संघ निवडीबद्दल भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन म्हणाले, सुल्तान अझलन शाह कप हा नेहमीच आंतरराष्ट्रीय हॉकी कॅलेंडरमध्ये एक महत्त्वाचा स्पर्धा राहिला आहे आणि आम्हाला एका संतुलित संघासह सहभागी होण्यास उत्सुकता आहे. आमचे लक्ष आक्रमण आणि बचाव दोन्हीमध्ये आमची रचना सुधारण्यावर, दबावाखाली योग्य निर्णय घेण्यावर आणि संपूर्ण खेळात सातत्य राखण्यावर आहे. या संघाने प्रशिक्षणात उत्तम शिस्त आणि उत्साह दाखवला आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की, ते आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार आहेत. आम्हाला इपोहमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. आम्ही या स्पर्धेचा वापर आमच्या दीर्घकालीन २०२६ विश्वचषक आणि आशियाई क्रीडा चक्रात एक महत्त्वाचा टप्पा म्हणून करू.
सुल्तान अझलन शाह कप २०२५ साठी भारतीय पुरुष संघ खालीलप्रमाणे आहे:
गोलरक्षक - पवन आणि मोहित होनेनहल्ली शशीकुमार.
बचावपटू - पूवन्ना चंदुरा बॉबी, नीलम संजीव झेस, यशदीप सिवाच, जुगराज सिंग, अमित रोहिदास आणि संजय (कर्णधार).
मिडफिल्डर - राजिंदर सिंग, राज कुमार पाल, नीलकांत शर्मा, रविचंद्र सिंग मोइरांगथेम, विवेक सागर प्रसाद, आणि मोहम्मद राहिल मौसीन.
फॉरवर्ड्स - सुखजीत सिंग, शिलानंद लाक्रा, सेल्वम कार्ती, आदित्य अर्जुन लालगे, दिलप्रीत सिंग आणि अभिषेक.
स्टँडबाय खेळाडू - वरुण कुमार, विष्णू कांत सिंग, हार्दिक सिंग आणि अंगद बीर सिंग.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे