
जळगाव, 13 डिसेंबर (हिं.स.) अमळनेर तालुक्यातील लोणखुर्द गावाजवळ माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली. लोणखुर्द–मूडी रस्त्यावरील एका बंद घराजवळ अज्ञात व्यक्तीने नवजात मानवी अर्भक निर्दयपणे उघड्यावर फेकून दिल्याचे समोर आले असून, गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या या अर्भकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे. लोणखुर्द येथील पोलीस पाटील उदय निंबाजी पाटील यांनी या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ते शेतात काम करत असताना गावातील एका व्यक्तीने त्यांच्या पत्नीला फोन करून कैलास भगवान पाटील यांच्या बंद घरालगत जखमी अवस्थेत नवजात अर्भक पडल्याची माहिती दिली. ही बातमी समजताच पाटील दाम्पत्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पाहणी केली असता ते मानवी नवजात अर्भक असल्याचे स्पष्ट झाले. धक्कादायक बाब म्हणजे अर्भकाच्या पोटाचे लचके तुटलेले असल्याने त्याचे लिंग ओळखता येत नव्हते. हा भयावह प्रकार पाहून त्यांनी तात्काळ मारवड पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेच्या सहाय्याने अर्भकाला ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर अर्भकाला मयत घोषित केले. कोणीतरी अज्ञात, निर्दयी व्यक्तीने नवजात अर्भकाला रस्त्यावर फेकून देत अमानुष कृत्य केल्याची प्राथमिक खात्री झाल्यानंतर पोलीस पाटील उदय पाटील यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर