
बीड, 14 डिसेंबर, (हिं.स.)
दहा लाख रुपये घेऊन लग्न केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत नवरी मुलगी पसार झाली. माहेरी गेलेल्या मुलीला परत आणण्याचे प्रयत्न केले, मात्र तिने नकार दिला. पोलिसांत प्रकरण गेले, तक्रार निवारण केंद्रात समुपदेशन झाले तरीही मुलगी नांदायला आली नाही. अखेर या प्रकरणात ३ वर्षांनंतर नवरी मुलगी, तिचे आई-वडिल व लग्नात मध्यस्थी करणाऱ्या विरोधात गुन्हा नोंदवला गेला.
बीड शहरात वास्तव्यास एका तरुणाचे लग्न होत नव्हते. त्याला त्याच्या एका नातेवाईकाने १५ लाख रुपये दिल्यास एक मुलगी लग्नासाठी असल्याचे सांगितले. त्याने होकार दिला. सुरुवातीला पाच लाख रुपये दिले. त्यानंतर लग्न पार पडले. लग्नावेळी पाच लाख रुपये दिले. असे एकूण १० लाख रुपये देण्यात आले. यानंतर २ महिन्यांनी नवरी घरातील काही दागीने घेऊन पसार झाली. सुरुवातीला ती मोहरी नसल्याचे सांगितले गेले. त्यामुळे बीड शहर पोलिसांत मिसींगची नोंद केली गेली.
काही दिवसांनी ती मोहरी असल्याची माहिती मिळाल्याने शहर पोलिस व मुलाचे कुटुंबिय बुलढाणा जिल्ह्यात मुलीच्या गावी गेले. तिथे मुलीने नांदायला यायला नकार दिला. यानंतर पोलिसांनी
मिसिंग अर्ज निकाली काढला. मुलाने बीडच्या तक्रार निवारण केंद्रात अर्ज केला. तिथेही मुलीने नांदायला यायला नकार दिला. दरम्यानच्या काळात मुलाकडे लग्नातील राहिलेले ५ लाख रुपये देण्याची मागणी झाली. ५ लाख दिल्यास मुलगी नांदायला येईल असे सांगितले. मात्र मुलाने मुलगी नांदत नसल्याने १० लाख परत द्या अशी मागणी केली. या प्रकरणात मुलाच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis