
अकोला, 02 मार्च (हिं.स.)। भारतीय नागरी सुरक्षा संहिता, २०२३ अंतर्गत तपास प्रक्रियेला अधिक सक्षम, गतिमान व वैज्ञानिक स्वरूप देण्यासाठी अकोला जिल्ह्यात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वित करण्यात आली आहे. आज रोजी सदर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा शुभारंभ पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, परी. सहा. पोलीस अधीक्षक इशानी आनंद, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनबाबत माहिती न्यायवैज्ञानिक प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी न्या.वै.प्र. संचालनालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासाठी टप्प्याटप्प्याने मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यानुसार प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, अमरावती येथून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, बाळापुर करिता एक (१) मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन वाहन क्रमांक MH-12-ZC-9838 प्राप्त झाली आहे. सदर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपविभागीय पोलीस अधिकारी, बाळापुर यांच्या कार्यालयाच्या अधिपत्याखाली कार्यान्वित करण्यात येणार असून, इतर व्हॅन उपलब्ध होईपर्यंत संपूर्ण उपविभागीय हद्दीत या व्हॅनची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
फॉरेन्सिक सुविधा व साधनसामग्री या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनसोबत विविध फॉरेन्सिक किट्स, रसायने, तांत्रिक उपकरणे व इतर आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे गुन्हेगारी घटनास्थळी तात्काळ वैज्ञानिक तपास, पुराव्यांचे संकलन व विश्लेषण करणे शक्य होणार आहे.
फॉरेन्सिक तज्ञ व कर्मचारी सी.एस.एम. कॉम्पुटर्स इंडिया लिमिटेड, मुंबई यांच्या पत्रानुसार खालीलप्रमाणे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत अभिषेक माधवराव भारसाकडे - सहायक रासायनिक विश्लेषक, श्रीम. स्वाती अजाबराव लोड सहायक रासायनिक विश्लेषक, रिषभ भागवत कांबळे - वैज्ञानिक सहायक, पूजा साखरे वैज्ञानिक सहायक, अभिजित दिलीप टिकार - वाहन चालक, उकंडा भगवान उंदारे वाहन चालक, संतोष सुखदेव शिंदे प्रयोगशाळा परिचर, अमरनाथ गणपतराव कोयेकर प्रयोगशाळा परिचर असणार आहेत.तपास प्रक्रियेला मोठी चालना या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे अकोला जिल्ह्यातील गुन्हे तपास अधिक वैज्ञानिक, जलद व पारदर्शक होण्यास मदत होणार असून, न्यायप्रक्रियेला बळकटी मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे