
अकोला, 02 मार्च (हिं.स.)।अकोला जिल्ह्यात सोमवारी होळी व ३ मार्च रोजी धुलीवंदन हा सण परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता तसेच जातीय सलोखा अबाधित राहावा यासाठी अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक अकोला अर्चीत चांडक साहेब यांचे मार्गदर्शना खाली, व्यापक, कडक व बहुस्तरीय बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.
नाकाबंदी व वाहतूक नियंत्रण अकोला शहरातील एकूण ८ पोलीस स्टेशन हद्दीत प्रत्येकी ४ अशा एकूण ३२ नाकाबंदी पॉईंट कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. जिल्हयातील तालुका स्तरीय पोलीस स्टेशन येथे प्रत्येकी ०४ नाकाबंदी पॉईट कार्यरत असतील. प्रत्येक पोलीस स्टेशनला ब्रेथ अनालायझर यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. दारू पिवुन घालविणारे, दुसऱ्याच्या जिवाला धोका होईल अशी वाहने चालविणारे, हुडदंगबाजी करणारे वाहन चालक यांच्यावर परिणाम कारक केसेस करून वाहने जप्त करण्यात येतील, प्रत्येक नाकाबंदी पॉईंटवर १ पोलीस अधिकारी, ४ पोलीस अंमलदार तसेच वाहतूक शाखेचे कर्मचारी तैनात राहणार आहेत. सर्व नाकाबंदी ठिकाणी ब्रेथ अॅनालायझर यंत्र उपलब्ध असून, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ट्रीपल सीट, वेगात वाहन चालविणे, हुल्लडबाजी करणाऱ्यांची वाहने जप्त करून प्रभावी गुन्हे दाखल करण्यात येतील.
जिल्हाभरबंदोबस्त व मनुष्यबळ होळी व धुलीवंदन उत्सवाच्या काळात संपूर्ण जिल्ह्यात ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, २३ पोलीस निरीक्षक, १०७ पोलीस उपनिरीक्षक, सुमारे २२०० पोलीस अंमलदार, ८५० होमगार्ड, ४ QRT पथके, ६ स्ट्रायकिंग फोर्स, तसेच १ SRPF कंपनी तैनात ठेवण्यात आली आहे. संवेदनशील भाग, मिश्रवस्ती, प्रमुख चौक, बाजारपेठा, तसेच महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. धार्मिक स्थळे व जातीय सलोखायावर्षी होळी व धुलीवंदन उत्सव रमजान महिन्यात येत असल्याने विशेष दक्षता घेण्यात येत आहे. प्रत्येक मस्जिद, दर्गा व इतर धार्मिक स्थळांजवळ फिक्स पॉईंट नेमण्यात आले असून, धार्मिक स्थळे व राष्ट्रीय पुरुषांच्या पुतळ्यांच्या परिसरात सतत मोबाईल पेट्रोलिंग ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची विटंबना, रंग फेकणे, जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या कृती केल्यास तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल.
महिला सुरक्षितताउत्सवाच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात आले असून, प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत दामिनी पथकांची सतत गस्त ठेवण्यात येणार आहे. महिलांची छेडछाड, विनयभंग, अश्लील वर्तन किंवा कोणतीही अनुचित घटना घडल्यास तात्काळ कारवाई केली जाईल.
अकोला जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुसज्ज जीपद्वारे मोबाईल पेट्रोलिंग ठेवण्यात येणार असून, जीपमध्ये PA सिस्टीम, दंगल नियंत्रण साहित्य, सुरक्षा साधने उपलब्ध राहणार आहेत. बिनतारी संदेश यंत्रणा व दळणवळण व्यवस्था उत्सव काळात पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्यात येणार आहे. नागरिकांना आवाहन अकोला जिल्हा पोलीस दल सर्व नागरिकांना आवाहन करते की, होळी व धुलीवंदन सण शांततेत, आनंदात व कायद्याच्या चौकटीत साजरे करावेत. अफवांवर विश्वास ठेवू नये, कायदा हातात घेऊ नये व कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. किंवा पोलीस मदत क्रमांक 112 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे..
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे