
अकोला, 17 डिसेंबर (हिं.स.)।
महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं आहे.. गेल्या निवडणुकीत एक हाती सत्ता असलेल्या भाजपची आगामी निवडणुकीत डोकेदुखी वाढणार असल्याची शक्यता आहे.. ‘नागरिक संवाद मंच’मुळे राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागले असतानाच, भाजपासमोर अंतर्गत नाराजी आणि बंडखोरीचे गंभीर आव्हान उभे ठाकल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. भाजपमधून निष्कासित झालेले आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘नागरिक संवाद मंचा’मुळे अकोल्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने नाराज झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते व तब्बल ३० वर्षे नगरसेवक राहिलेले हरीश अलीमचंदानी यांनी पक्षाला रामराम ठोकत निवडणूक लढवली. दरम्यान वंचित बहुजन आघाडीने त्यांना साथ दिली.
त्याचप्रमाणे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशोक ओळंबे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून भाजपविरोधात निवडणूक लढवली.या दोन्ही बंडखोर उमेदवारांमुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन झाले आणि त्याचा थेट फटका भाजपला बसला. अखेर भाजपला या मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला.
पराभवानंतर भाजपने पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत अनेक आजी माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला.
आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप या निष्कासित कार्यकर्त्यांचा पुनर्विचार करणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.
याच पार्श्वभूमीवर नाराज नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत ‘नागरिक संवाद मंच’ची स्थापना केली आहे. या मंचाच्या माध्यमातून आयोजित संवाद कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली.
या संवादातून अप्रत्यक्षपणे भाजपला थेट आव्हान देण्यात आल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, या शक्तिप्रदर्शनानंतर भाजपविरोधात ‘विकास आघाडी’च्या नावाने एकत्रित मोर्चेबांधणी होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. जर हे सर्व नाराज नेते आणि कार्यकर्ते प्रत्यक्षात एकत्र आले, तर भाजपची डोकेदुखी निश्चितच वाढणार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
विशेषतः हरीश अलीमचंदानी यांच्या नेतृत्वाखाली आघाडी उभारावी, अशी मागणी संवाद मंचात उपस्थित आयोजकांसह अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे