
· राजदूत विशाल शर्मांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट
मुंबई, 17 डिसेंबर (हिं.स.)
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात उभारणे ही गौरवाची, ऐतिहासिक आणि जागतिक स्तरावर महत्वाची घटना आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि मानवाधिकारांचे जागतिक प्रवक्ते म्हणून त्यांची ओळख आहे. शिक्षण हे यशाकडे नेणारे साधन आहे हा बाबासाहेबांचा संदेश जगभर पोहोचविण्याच्या उदात्त हेतूने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोला भेटस्वरूपात देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
युनेस्कोला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेटस्वरूपात अर्पण केल्याबद्दल युनेस्को, पॅरिस येथील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल व्ही. शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेत आभार मानले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची ही भारताच्या ८० वर्षांच्या सदस्यत्वातील पहिलीच घटना असल्याचे शर्मा यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने युनेस्कोमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण होणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक बाब असून, या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन केले.
केंद्र शासनाच्या वतीने शर्मा यांनी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने युनेस्कोमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला युनेस्कोचे महासंचालक, ५० हून अधिक देशांचे राजदूत तसेच युनेस्को सचिवालयाचे सदस्य उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे संदेश यावेळी वाचून दाखविण्यात आले होते, तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे कार्यक्रमास संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बाबासाहेबांचा समतेचा संदेश आणि शिक्षणाचे महत्व जगभरातील तरूणांपर्यंत पोहोचविण्याचा हा राज्य व केंद्र शासनाचा प्रयत्न होता. याचबरोबर, छत्रपती शिवाजी महाराजांचे ११ किल्ले (तामिळनाडूतील एक) असे देशातील १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणे ही राज्यासाठी अत्यंत गौरवास्पद बाब असून, हा नामांकन सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनी शिवनेरी किल्ल्यावर भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा शासनाचा मानस आहे.
छत्रपतींचा समृद्ध वारसा जतन व संवर्धन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनी भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा म्हणजेच ‘लोककल्याणासाठीच राज्य’ या विचाराशी सुशासनाचा संदेश जोडण्याचा प्रयत्न करण्यात यावा. तसेच दीपावलीचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून समावेश करताना, दिखाव्यापेक्षा त्यामागील मूल्यांचा विचार करून सुशासनाची संकल्पना पुढे नेण्याची गरज आहे.
किल्ले व वारसा आधारित विकासासाठी ५० हजारापेक्षा जास्त रोजगार तयार होईल आणि एक हजार कोटीच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडे असलेल्या प्रस्तावावर यावेळी चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, सांस्कृतिक विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गारगे यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच सांस्कृतिक व पुरातत्त्व विभागातील अधिकाऱ्यांशीही राजदूत शर्मा यांनी चर्चा केली. चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी शर्मा भेट देणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी