
रत्नागिरी, 17 डिसेंबर, (हिं. स.) : येथील डी. बी. जे. महाविद्यालयात संस्कृतभारती, उत्तर रत्नागिरी, चिपळूण यांच्यातर्फे सामूहिक भगवद्गीता पठण कार्यक्रम येत्या २० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध एकादशीला भगवद्गीता जयंती साजरी केली जाते. त्यानिमित्ताने शनिवारी, दि. २० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता भगवद्गीतेच्या दहाव्या, बाराव्या आणि पंधराव्या अध्यायांचे सामूहिक पठण केले जाणार आहे.
डी. बी. जे. कनिष्ठ महाविद्यालयाचे वाङ्मय मंडळ व संस्कृत विभागाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन भगवद्गीता पठणाचा आनंद घ्यावा, असे आवाहन डी. बी. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट आणि संस्कृतभारती उत्तर रत्नागिरी जनपद अध्यक्षा व डी. बी. जे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या संस्कृत विभागप्रमुख डॉ. सौ. माधवी जोशी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी