
परभणी, 17 डिसेंबर (हिं.स.)।
बांबू लागवडीच्या बिलावर सही करून वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यासाठी लाच मागणाऱ्या सामाजिक वनीकरण विभागातील वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. अमोल गणेशराव फड (३९), वनपाल, सामाजिक वनीकरण सेलू (अतिरिक्त कार्यभार वनपरिक्षेत्र अधिकारी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार यांच्या मौजे मानोली (ता. मानवत, जि. परभणी) येथील शेतजमिनीत करण्यात आलेल्या बांबू लागवडीच्या कुशल कामाचे १ लाख ७३ हजार २८० रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी आरोपीने १५ टक्के रकमेची मागणी केली होती. तडजोडीनंतर १० हजार रुपयांची लाच ठरवण्यात आली, यापैकी २ हजार रुपये आधीच स्वीकारण्यात आले होते. उर्वरित रक्कम देण्यासाठी आरोपीने तक्रारदारास पुन्हा बोलावले. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, परभणी येथे तक्रार दाखल केली. पडताळणी दरम्यान आरोपीने लाचेची मागणी कायम ठेवल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पाथरी टोल नाका येथे सापळा रचून आरोपीने ५ हजार रुपये लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ अटक केली.
या प्रकरणी पोलीस स्टेशन पाथरी येथे गुन्हा र. नं. ७०९/२०२५, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलाणी करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक महेश पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis