
चंद्रपूर, 17 डिसेंबर (हिं.स.)।
नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील ३६ वर्षीय शेतकरी रोशन शिवदास कुळे यांनी सावकारी कर्जापायी आपली किडनी विकल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तपासला वेग आला आहे.सहा पैकी पाच अवैध सावकारांना मंगळवारी अटक करण्यात आली असून या सर्व आरोपींना ब्रम्हपुरी येथील न्यायालयात हजर केले असता, त्यांना २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ब्रम्हपुरी शहरात अवैध सावकारी करून कर्जदारांची अमानुष पद्धतीने आर्थिक, मानसिक व शारीरिक पिळवणूक केल्याप्रकरणी ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात ६ अवैध सावकारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मनिष पुरुषोत्तम घाटबांधे (42, रा. पटेल नगर, ब्रम्हपुरी) हा अद्यापही फरार आहे.
उर्वरित आरोपी किशोर रामभाऊ बावणकुळे (42, रा. कुर्झा वॉर्ड, ब्रम्हपुरी), लक्ष्मण पुंडलिक उरकुडे (47, रा. पटेल नगर, ब्रम्हपुरी), प्रदीप रामभाऊ बावणकुळे (38, रा. देलनवाडी वॉर्ड, ब्रम्हपुरी), संजय विठोबा बल्लारपुरे (50, रा. फवारा चौक, पटेल नगर, ब्रम्हपुरी) आणि सत्यवान रामरतन बोरकर (रा. टेकरी, ता. सिंदेवाही, ह. मु. चांदगाव रोड, ब्रम्हपुरी) यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आलेली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव