
परभणी, 17 डिसेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील गरजू शेतकरी व नागरिकांनी विनापरवाना सावकारांकडून कर्ज घेऊ नये. सहकार विभागाने परवाना दिलेल्या परवानाधारक सावकारांकडूनच कर्ज घ्यावे, असे स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे. यामुळे अवैध सावकारीला आळा बसण्यास मदत होईल तसेच कर्जदारांचे आर्थिक शोषण थांबेल, असे त्यांनी सांगितले.
परभणी जिल्ह्यात एकूण 134 परवानाधारक सावकार कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासन यांचे राजपत्र दिनांक 16 सप्टेंबर 2014 नुसार परवानाधारक सावकारांनी आकारावयाच्या व्याजदरांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांसाठी तारण कर्जावर 9 टक्के प्रतिवर्ष व विनातारण कर्जावर 12 टक्के प्रतिवर्ष इतका व्याजदर आहे. शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींसाठी तारण कर्जावर 15 टक्के प्रतिवर्ष व विनातारण कर्जावर 18 टक्के प्रतिवर्ष व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.
अवैध सावकारीमुळे पीडित शेतकरी व नागरिकांनी न घाबरता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तथा सावकारांचे जिल्हा निबंधक, शिवाजीनगर, परभणी (संपर्क क्रमांक 02452-220046, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) येथे तक्रार दाखल करावी. तक्रारदाराचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले असून, अवैध सावकारीविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 कायदा अंमलात आल्यापासून कलम 18(2) नुसार जिल्हयात 39 हेक्टर 12 आर जमीन शेतकऱ्यांना अवैध सावकाराकडून परत केलेल्या आहेत. सन 2014 पासून 32 अवैध सावकारांवर धाडी टाकण्यात आल्या असून 10 अवैध सावकारांवर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) संजय भालेराव यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis