
* केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ‘समीर ऍप’ व संकेतस्थळावर अधिकृत आकडेवारी उपलब्ध
मुंबई, 17 डिसेंबर (हिं.स.) - केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे उपलब्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार गेल्यावर्षी दिनांक १ ते १६ डिसेंबर २०२४ च्या तुलनेत यंदा सदर कालावधीदरम्यान हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. दिनांक १ ते १६ डिसेंबर २०२४ या कालावधीसाठी गेल्यावर्षी हवा गुणवत्ता निर्देशांक हा १६७ ते १५८ या दरम्यान होता. तर, यंदा दिनांक १ ते १६ डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी हा निर्देशांक १०५ ते ११३ असा सुधारित झालेला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अविरतपणे व सातत्याने केले जात असलेले सर्वस्तरिय प्रयत्न याचे सकारात्मक परिणाम केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे जारी करण्यात आलेल्या हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या (AQI) आकडेवारीमध्ये दिसून येत असल्याची माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.
या अनुषंगाने अधिक माहिती देताना डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले की, हवा निर्देशांक पाहण्याकरिता नागरिकांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे जारी करण्यात आलेली अधिकृत आकडेवारीच बघावी. यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे https://cpcb.nic.in हे संकेतस्थळ व भ्रमणध्वनीवर उपलब्ध असणारे ‘समीर’ हे अधिकृत ऍप वापरावे, असेही आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे प्राधिकृत करण्यात आलेल्या अत्याधुनिक यंत्र-सामुग्रीद्वारे (CAAQMS) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता नियमितपणे तपासली जाते. ही तपासणी करण्यासाठी उच्च गुणवत्तेची (Reference Grade) हवा गुणवत्ता मापन यंत्रणा वापरली जाते. या यंत्रणेद्वारे उपलब्ध होणारी आकडेवारी ही अधिक विश्वासार्ह असते. यानुसार ही आकडेवारी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या https://cpcb.nic.in या संकेतस्थळावर आणि ‘समीर’ (SAMEER) या अधिकृत भ्रमणध्वनी ऍपवर उपलब्ध करुन देण्यात येत असते.
यानुसार दिनांक १ ते १६ डिसेंबर या दरम्यानची हवा गुणवत्ता निर्देशांकाची (AQI) वर्ष २०२५ व २०२४ या सलग दोन वर्षांची तुलनात्मक आकडेवारी (कंसातील आकडेवारी ही त्याच दिनांकाची गेल्यावर्षीची आकडेवारी आहे) पुढीलप्रमाणे
दिनांक १ डिसेंबर - १०५ (१६७),
दिनांक २ डिसेंबर - १२६ (१७४),
दिनांक ३ डिसेंबर - १२८ (१२९),
दिनांक ४ डिसेंबर - १३८ (१३९),
दिनांक ५ डिसेंबर - १२४ (१५४),
दिनांक ६ डिसेंबर - ११६ (१४८),
दिनांक ७ डिसेंबर - ११३ (१२६),
दिनांक ८ डिसेंबर - १२० (१२५),
दिनांक ९ डिसेंबर - ११५ (११२),
दिनांक १० डिसेंबर - १०१ (१३१),
दिनांक ११ डिसेंबर - १०५ (१३९),
दिनांक १२ डिसेंबर - ११२ (१३७),
दिनांक १३ डिसेंबर - ११५ (१२८),
दिनांक १४ डिसेंबर - १३१ (१३४),
दिनांक १५ डिसेंबर - १२२ (१५९),
दिनांक १६ डिसेंबर - ११३ (१५८).
वरील आकडेवारी लक्षात घेतल्यास गेल्या काही महिन्यांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सातत्याने करण्यात येत असलेल्या सर्वस्तरिय प्रयत्नांचे सकारात्मक प्रतिबिंब या आकडेवारीमध्ये पडल्याचे दिसून येत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
बृहन्मुंबई महापालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या सर्वस्तरिय प्रयत्नांमध्ये पाण्याच्या टँकरद्वारे डीप क्लीनिंग करण्यासह रस्ते स्वच्छ करणे, मिस्टींग मशीनद्वारे फवारणी करणे, योग्य उपाययोजना न करणा-या बांधकामांना कारणे दाखवा नोटीस बजावणे, कार्यस्थगिती आदेश (Stop Work Notice) देणे, या बाबींचा प्रामुख्याने समावेश आहे. या अंतर्गत दिनांक १ ते १६ डिसेंबर २०२५ दरम्यान ३७६ ठिकाणी पाण्याच्या टँकरद्वारे रस्ते स्वच्छ करण्यासह डीप क्लीनिंग करण्यात आले, २५३ ठिकाणी मिस्टींग मशीनद्वारे फवारणी करण्यात आली, ३५३ प्रकरणी कारणे दाखवा नोटीस; तर १२१ ठिकाणी कार्यस्थगिती आदेश बजाविण्यात आले आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे यंदाच्या हिवाळ्यातील हवा गुणवत्तेत सुधारणा दिसून येत असून, ती मध्यम श्रेणीत आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल खात्याचे उप आयुक्त श्री. अविनाश काटे यांनी दिली आहे.
या अनुषंगाने सर्व संबंधितांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात येत आहे की, कचरा जाळणे अथवा तत्सम बाबी करणे टाळावे. त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे व प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे देण्यात येणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेला सहकार्य करावे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी