
नाशिक, 17 डिसेंबर (हिं.स.)।
धार्मिक व आध्यात्मिकदृष्ट्या प्राचीन रामकुंडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मनपा प्रशासनाने वस्त्रांतरगृह पाडल्यापासून सूर्योदयाची किरणे थेट रामकुंडात पडत आहेत. यामुळे भाविकांचे आस्था स्थान असलेल्या रामकुंडात पुन्हा श्रद्धेचे सूर्यकिरण अवतरल्याने भाविकांसह स्थानिकांत समाधान व्यक्त होत आहे.
प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे पंचवटी होय. दर बारा वर्षांनी सिंहस्थ मेळा भरतो. यामुळे धार्मिक व आध्यात्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्वदेखील आहे. सिंहस्थ म्हटले की, त्यात केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामे केली जातात. भक्त भाविकांसह पर्यटकांची ३६५ दिवस वर्दळ सुरू असते. पंचवटीतील प्राचीन पवित्र रामकुंडात भक्त स्नान करतात. या भाविकांच्या सोयीसाठी नाशिक महापालिकेने १९९२ मध्ये रामकुंडालगत वस्त्रांतरगृहाची
उभारणी केली होती. हे वखांतरगृह बांधल्यापासून वाद आहे. त्यानंतर काही काळातच वस्त्रांतरगृहाचा तीन वर्षांसाठी ताबा पुरोहित संघाकडे देण्यात आला होता. मात्र, १९९५ ला करारनामा नूतनीकरण झाले नाही. वस्त्रांतरगृह ताब्यात घेतल्यापासून ३८ लाख ७१ हजार रुपये भाडे थकले आहे. महापालिकेने पुरोहित संघासोबत केलेल्या करारनाम्यात अटी व शर्ती पालन न झाल्यास ३० दिवसांची नोटीस देऊन इमारत ताब्यात घेण्याची अट आहे. त्याअनुषंगाने पंचवटी विभागीय अधिकाऱ्यांनी वस्त्रांतरगृह ताब्यात घेण्याची नोटीस बजावली असल्याची माहिती उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली होती. दीड महिन्यापूर्वी हे वस्त्रांतरगृह पाडण्याचे कामकाज सुरू झाले होते. आजरोजी कामकाज पूर्ण झाले असून भक्त भाविकांचे आस्था स्थान असलेल्या पवित्र प्राचीन रामकुंडात सूर्योदयाची किरणे पडत आहेत. यामुळे भक्त भाविक यांच्यासह स्थानिकांकडूनदेखील समाधान व्यक्त होत आहे.
धार्मिक महत्त्व
रामकुंडात स्नान केल्याने ब्रह्महत्येचे पाप शालन होते. त्यामुळे येथील स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सूर्योदयावेळी थेट पडणारे किरणे श्रद्धेचे व आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र मानले जाते. विशिष्ट काळात सूर्यकिरण सरळ रामकुंडाच्या पाण्यावर तसेच स्नान करणाऱ्या भक्त भाविकांच्या शरीरावर पडतात. धार्मिक परंपरेनुसार या किरणांना विशेष महत्त्व असून, त्यातून शारीरिक व मानसिक शुद्धीकरण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. आध्यात्मिक पातळीवर सूर्य, जल आणि साधनेचा संगम शरीर-मनावर सकारात्मक परिणाम करतो, असा उल्लेख योगशास्त्र व आयुर्वेदात आढळतो.
रामकुंड मोकळे झाल्याने भाविकांना स्नानावेळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देणे सुलभ होणार असून, बाहेरून येणाऱ्या भाविकांना रामकुंड ओळखणेही सोपे झाले आहे. पूर्वी रामशेज किल्ल्यावरून उगम पावणारी अरुणा नदी इंद्रकुंडामार्गे रामकुंडात येऊन गोदावरीशी संगम साधत होती. याच संगमामुळे रामकुंड व नाशिक सिंहस्थ मेळ्याला धार्मिक महत्त्व आहे. आज अरुणा-गोदावरीचा प्रत्यक्ष संगम होत नसल्याने गोदावरीच्या उपनद्यांचे पुनरुजीवन आवश्यक आहे. जिवंत पाण्याचे स्रोत म्हणजेच गोदातीर्थ असून त्यालाच धार्मिक शुद्धतेचे महत्त्व आहे.
देवांग जानी, अध्यक्ष, गोदाप्रेमी सेवा समिती
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV