
रत्नागिरी, 17 डिसेंबर, (हिं. स.) : जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी रत्नागिरीत आंतरशालेय नृत्य स्पर्धेचे आयोजन येत्या २४ डिसेंबर रोजी केले आहे.
येथील आकार डान्स ॲकॅडमीतर्फे येत्या २४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी सहभाग घेणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना शास्त्रीय, पाश्चिमात्य, लोकनृत्य, फ्री स्टाइल अशा विविध नृत्य प्रकारांमध्ये आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे. पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी, सातवी ते नववी, दहावी ते बारावी असे चार गट करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातून तीन क्रमांक व दोन उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेची बक्षिसे रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र या स्वरूपात असतील. सहभागी सर्व विद्यार्थ्यांसाठी लकी ड्रॉ काढण्यात येणार असून त्यामध्ये स्मार्ट वॉच, ब्लूटूथ स्पीकर, सायकल जिंकण्याची मिळणार आहे.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना कला व संस्कृतीची आवड निर्माण होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढावा, हा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. शाळेतील स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सोलो डान्स व ग्रुप डान्सचे गाणे किमान तीन आणि कमाल पाच मिनिटांचे असावे. स्पर्धेच्या ठिकाणी शाळेचे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. खास शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रोत्साहन देण्याकरिता यावे, असे आवाहन केले आहे.
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी आकार डान्स ॲकॅडमीचे संचालक अमित कदम यांच्याशी 9175594747 या क्रमांकावर संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी