

रायगड, 18 डिसेंबर (हिं.स.)। साहस फौंडेशनच्या वतीने एस.एस. सिनेव्हिजन आणि श्री प्रह्लाद राय झुलेलाल ट्रस्ट, पनवेल यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेली ‘ब्युटी पेजंट – महाराष्ट्रची सौंदर्यवती 2025’ ही भव्य सौंदर्यस्पर्धा पनवेल येथील सिंधी पंचायत हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन साहस फौंडेशनच्या अध्यक्षा रेश्मा कुरूप, झुलेलाल ट्रस्टचे ऍडव्होकेट मनोहर सचदेव, अभिनेत्री सिद्धी कामत, रेश्मा भोईर आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
या ब्युटी पेजंटचे वैशिष्ट्य म्हणजे लहान मुले-मुली, मिस, मिसेस यांच्यासह स्पेशली एबल्ड चाईल्ड यांनाही स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले. याबाबत अध्यक्षा रेश्मा कुरूप यांनी सांगितले की, सौंदर्यस्पर्धांच्या माध्यमातून सर्वांना समान व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या आत्मविश्वासात वाढ करणे आणि त्यांची कला, टॅलेंट सादर करण्याची संधी देणे, हाच संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
या स्पर्धेत एकूण ६५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रची सौंदर्यवती मिसेस (५०+ वयोगट) विजेतेपद सौ. मानसी सुर्वे यांनी पटकावले, तर महाराष्ट्रची सौंदर्यवती मिसेस सौ. हर्षला कारंडे आणि महाराष्ट्रची सौंदर्यवती मिस पूजा भांडारकर ठरल्या. तसेच फॅशन आयकॉन, फोटोजेनिक फेस आदी विविध टायटल्स देऊन स्पर्धकांचा क्राऊन व ट्रॉफीने सन्मान करण्यात आला. विजेत्यांना मालाबार ज्वेलर्सकडून चांदीचे नाणे आणि व्हीएलसीसीकडून गिफ्ट व्हाउचर देण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सिनेस्टार संजय खापरे, पत्रकार गणेश कोळी यांच्यासह संजय कदम, निलेश सोनावणे, केवल महाडिक, सुमंत नलावडे, संतोष आमले, सौ. मेघना कदम आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके