
तिरुवनंतपुरम, 18 डिसेंबर (हिं.स.)।जेद्दाहून कोझिकोडकडे जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या एका विमानाची गुरुवारी कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. प्राथमिक तपासात लँडिंग गिअर आणि टायरमध्ये बिघाड झाल्यामुळे ही आपत्कालीन लँडिंग करावी लागल्याचे समोर आले आहे. या विमानात १६० प्रवासी होते.
कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (CIAL) यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जेद्दाहून कोझिकोडला जाणारी एअर इंडिया एक्सप्रेसची फ्लाइट क्रमांक IX 398 सुरक्षितपणे आपत्कालीन परिस्थितीत उतरवण्यात त्यांनी यशस्वी मदत केली. लँडिंग गिअर आणि टायर फेल झाल्यामुळे झालेल्या तांत्रिक बिघाडाच्या कारणास्तव या विमानाला कोची येथे वळवण्यात आले होते.
निवेदनानुसार, हे विमान सकाळी ९.०७ वाजता सुरक्षितपणे कोचीन विमानतळावर उतरले. या दरम्यान सर्व आपत्कालीन सेवा तत्काळ सक्रिय करण्यात आल्या होत्या. या घटनेत कोणत्याही प्रवासी किंवा विमानातील कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा झाली नाही. लँडिंगनंतर करण्यात आलेल्या तपासणीत विमानाच्या उजव्या बाजूचे टायर फुटल्याचे आढळून आले. त्यानंतर लगेचच धावपट्टी (रनवे) स्वच्छ करून उड्डाण सेवा पूर्ववत करण्यात आल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode