
अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.)।अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने सुफी नगर, वलगाव येथे कत्तलीसाठी निर्दयतेने गोठ्यात बांधून ठेवलेल्या २६ गोवंशाची सुटका केली आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे यांच्या पथकाने पंचांसह छापा टाकून ही कारवाई केली.छाप्यात मोहमद साकीब मोहमद जाकीर (वय २१, रा. कसाबपूरा, पो.स्टे. वलगाव, जि. अमरावती) यांच्या गोठ्यात एकूण २६ गोवंश (गायी, बैल, कालवडी व गोरे) आढळून आले. प्रत्येकी अंदाजे २० हजार रुपये किमतीनुसार एकूण सुमारे ५ लाख २० हजार रुपयांचे गोवंश जप्त करण्यात आले. आरोपीकडे गोवंशाच्या मालकी हक्काची कोणतीही कागदपत्रे नसल्याने हे गोवंश कत्तलीसाठी निर्दयतेने बांधून ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले.या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ अंतर्गत कलम ५ (अ)(ब) तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याचा प्रतिबंध अधिनियम अंतर्गत कलम ११ (१)(क) अन्वये वलगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेले गोवंश गोरक्षण संस्था, दस्तुर नगर येथे संरक्षण व संवर्धनासाठी सुपूर्द करण्यात आले आहेत. आरोपीस पुढील तपासासाठी वलगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, पोलीस उपायुक्त (मुख्यालय व गुन्हे) रमेश धुमाळ व सपोआ शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सपोनि मनीष वाकोडे यांच्यासह पोलीस अंमलदार सतीश देशमुख, फिरोज खान, मंगेश लोखंडे, प्रशांत मोहोड, सैयद नाझिमुद्दीन, रणजित गावंडे व चालक प्रभात पोकळे सहभागी होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी