
लातूर, 18 डिसेंबर (हिं.स.) — लातूर लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित रेल्वे प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी ठोस आणि आक्रमक भूमिका घेतली आहे. संसदेत मुद्दे उपस्थित केल्यानंतर आज त्यांनी संसद भवनात केंद्रीय रेल्वेमंत्री मा. ना. अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लातूरकरांच्या जिव्हाळ्याच्या रेल्वे प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
या भेटीत लातूरला ‘वंदे भारत’ एक्सप्रेस सुरू करणे, लातूर–कुर्डुवाडी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण तसेच उत्तर-दक्षिण भारताशी थेट रेल्वे जोडणी यासह अनेक महत्त्वाच्या मागण्यांचा प्रस्ताव खासदार काळगे यांनी रेल्वेमंत्र्यांसमोर मांडला.
सरकारचे लक्ष वेधणाऱ्या प्रमुख मागण्या
लातूर–कुर्डुवाडी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण — वाढता वाहतुकीचा ताण लक्षात घेता तातडीने दुहेरीकरण करण्याची मागणी.
लातूरला ‘वंदे भारत’ एक्सप्रेस — लातूर रेल्वे स्थानकातून हायस्पीड ‘वंदे भारत’ रेल्वे सुरू करण्याचा आग्रह.
उत्तर-दक्षिण भारताशी थेट जोडणी — लातूरचा संपर्क देशाच्या उत्तर व दक्षिण भागाशी थेट व्हावा, यासाठी नवीन रेल्वे मार्गांची मागणी.
रेल्वे मार्गांचा विस्तार —
बेंगळूरू–नांदेड रेल्वे नागपूरपर्यंत वाढवावी.
बिदर–मछलीपट्टणम रेल्वे लातूरपर्यंत विस्तारित करावी.
वेळापत्रकात सुधारणा — अमरावती–पुणे एक्सप्रेस आणि पुणे–लातूर इंटरसिटीच्या वेळेत बदल करून प्रवाशांना दिलासा द्यावा.
मार्ग बदलाची मागणी — मुंबई–पुण्याहून दक्षिणेकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या कलबुर्गीऐवजी लातूर मार्गे वळवाव्यात.
यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे म्हणाले, “लातूरच्या रेल्वे विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. रेल्वेमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून, हे सर्व प्रश्न मार्गी लागेपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील.”
या भेटीमुळे लातूर, उदगीर, मुरुड आणि लातूर रोड परिसरातील रेल्वे प्रवाशांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis