
नाशिक, 18 डिसेंबर (हिं.स.)
नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय १९ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटीत नाशिकने नांदेडवर १ डाव व २७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. सामन्यात एकूण ११ बळी घेणारा लेग स्पिनर करण कोल्हे हा विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्याने पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात ६ बळी घेतले. अथर्व सूर्यवंशीने देखील अष्टपैलू कामगिरी केली.
मेरी नंबर २, म्हसरूळ येथील मैदानावर झालेल्या या सामन्यात नाशिकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ७ बाद ३१२ धावांवर पहिला डाव घोषित केला. यात अथर्व सूर्यवंशीने सर्वाधिक नाबाद ६० तर ऋग्वेद जाधव ४५ आणि सलामीवीर चिन्मय भास्कर व विदुर मौले यांनी ४४ व ४१ धावा केल्या.उत्तरादाखल करण कोल्हेच्या भेदक लेग स्पिन समोर नांदेडला १३३ धावाच करता आल्या. करणने केवळ १५ धावात ५ गडी बाद केले. त्यास देवाशिष गायकवाड व ज्ञानदीप गवळीने प्रत्येकी २ व आयुष सिंगने १ बळी घेत साथ दिली. नाशिकने पहिल्या डावात १७९ धावांची आघाडी घेतली. फॉलोऑन नंतर दुसऱ्या डावातहि करण कोल्हेने ६ बळी टिपले त्यास अथर्व सूर्यवंशीने ३ बळी घेत साथ दिली व नांदेडला १५२ धावापर्यतच मजल मारता आली व नाशिकने १ डाव व २७ धावांनी मोठा विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात सामन्यात सांगलीने प्रणव शिंदेची फलंदाजी - ७६ धावा तसेच प्रधुमन कोळी ६७ धावा व ४ बळी व आयुष रकताडे ६० धावा व ४ बळी यांच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर के जे सी ए, पुणे वर ७ गडी राखून विजय मिळवला.
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV