पीएनपी संकुलात १९ ते २२ डिसेंबरदरम्यान रंगणार ‘प्रभाविष्कार’
रायगड, 18 डिसेंबर (हिं.स.)। अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील पीएनपी शैक्षणिक संकुलाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा ‘प्रभाविष्कार’ हा भव्य सांस्कृतिक सोहळा १९ ते २२ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्य
१९ ते २२ डिसेंबरदरम्यान पीएनपी संकुलात रंगणार ‘प्रभाविष्कार’


रायगड, 18 डिसेंबर (हिं.स.)। अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील पीएनपी शैक्षणिक संकुलाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा ‘प्रभाविष्कार’ हा भव्य सांस्कृतिक सोहळा १९ ते २२ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा ठाव घेऊन त्यांच्या अंतर्मनाचा वेध घेणारा, तसेच सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा चार दिवसांचा सोहळा रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या वेश्वी येथील भव्य आणि सुसज्ज संकुलात दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत कार्यक्रम सादर होणार आहेत. या सोहळ्यात नृत्य, गायन, नाट्यप्रयोग, समूह सादरीकरणे, व्यक्तिमत्त्व विकासात्मक कार्यक्रमांसह विविध कला प्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी, शुक्रवार १९ डिसेंबर रोजी सीबीएससी होली चाईल्ड शाळेतील विद्यार्थ्यांचे सादरीकरण होईल. दुसऱ्या दिवशी, २० डिसेंबरला होली चाईल्ड इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थी आपले कलागुण सादर करतील. तिसऱ्या दिवशी, २१ डिसेंबर रोजी प्राथमिक व माध्यमिक मराठी शाळा तसेच बी.एड. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहेत. अंतिम दिवशी, २२ डिसेंबरला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी कला सादरीकरण करतील, तसेच रंगतदार महागरबा खेळून सोहळ्याची सांगता होणार आहे.

या चारही दिवसांत विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलेचा सन्मान करणारा हा भव्यदिव्य कौतुक सोहळा पाहण्यासाठी पालक, नागरिक व कला रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन पीएनपी शैक्षणिक संकुलाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande