
अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.)
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सकाळी शहरातील निवडणूक नियोजनाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. यासाठी त्यांनी महानगरपालिकेच्या विविध झोन कार्यालयांसह महत्त्वाच्या विभागांना भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली.या पाहणीमध्ये मध्य झोन क्र.२, पूर्व झोन क्र.३, पश्चिम झोन क्र.५, शिक्षण विभाग तसेच जुने तहसील कार्यालय यांचा समावेश होता. प्रत्येक ठिकाणी आयुक्तांनी निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या तयारीची माहिती घेतली. मतदान केंद्रांची रचना, मतदानासाठी लागणाऱ्या भौतिक सुविधा, मनुष्यबळाचे नियोजन, मतदार याद्यांची अद्ययावत स्थिती तसेच सुरक्षा व प्रशासकीय व्यवस्थेचा त्यांनी सखोल आढावा घेतला.पाहणीदरम्यान आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व वेळेत काम पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. तसेच निवडणूक काळात नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले.शिक्षण विभाग व जुने तहसील कार्यालयाच्या पाहणीदरम्यान निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या खोल्या, साहित्य साठवणूक, अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती तसेच दळणवळण व संपर्क व्यवस्थेबाबतही चर्चा करण्यात आली. आवश्यक ठिकाणी सुधारणा करण्याच्या सूचना देत आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.या पाहणीदरम्यान संबंधित झोनचे अधिकारी, विभागप्रमुख तसेच कर्मचारी उपस्थित होते. आगामी निवडणुका शांततापूर्ण व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असून, आयुक्तांच्या या पाहणीमुळे निवडणूक तयारीला अधिक गती मिळाल्याचे चित्र आहे. या पाहणी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती दुर्गा देवरे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्री प्रसन्नजीत चव्हाण, निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्री संतोष काकडे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा वन जमाबंदी अधिकारी श्री विवेकानंद काळकर, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, विधी अधिकारी श्रीकांतसिंह चौहान, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे, सहाय्यक आयुक्त मनोज शहाळे, बाजार परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश कडू, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, सहाय्यक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतिभा आत्राम, उपअभियंता प्रमोद इंगोले, विवेक देशमुख, अभियंता हेमंत महाजन, मनपा कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी