
बीड, 18 डिसेंबर (हिं.स.)।
गाव खेड्यात आयोजित करण्यात येणाऱ्या साहित्य संमेलनांना नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. सिंदफणा मराठी साहित्य संमेलन अत्यंत यशस्वी ठरले असून यामधून नवोदित जीवनातील प्रश्न साहित्यातून लेखक पुढे येतील व आपल्या मांडतील. साहित्यनिर्मितीत गुणवत्तेला प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य कवी श्रीधर नांदेडकर यांनी व्यक्त केले.
भास्कर चंदनशिव साहित्य नगरी, एकलव्य विद्यालय, शिरूर येथे आयोजित सिंदफणा मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी संमेलनाचा समारोप अतुल महाराज शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमास एकलव्यचे अध्यक्ष नवनाथ सानप,डॉ. विठ्ठल जाधव, गटशिक्षणाधिकारी प्रशांत शिंदे, प्राचार्य निलेश पोकळे यांची उपस्थिती होती. यावेळी तालुक्यातील शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच कला व वक्तृत्व क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.या मराठी साहित्य संमेलनात सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमात विद्यार्थी, लोककलावंतांनी सादर केलेल्या लोककलानृत्यांना उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. .
महाराष्ट्राची लोकधारा संमेलनाच्या पहिल्या सत्रात शाहीर अनिल तिवारी यांनी आपल्या खास शैलीत सादरीकरण केले. विनोदी किस्से, ग्रामीण जीवनावर भाष्य आणि ठसकेबाज मांडणीमुळे उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला. दैनंदिन अनुभव, समाजातील विसंगती आणि ग्रामीण संस्कृती यावर त्यांनी मार्मिक भाष्य केले. विनोदातून गंभीर आशय पोहोचवला.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis