
रायगड, 19 डिसेंबर (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील दिघी बंदर हे देशातील अग्रगण्य डॉकपैकी एक म्हणून ओळखले जाते. दिघी बंदराच्या विकासामुळे म्हसळा, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, बोर्ली आदी तालुक्यांतील विद्यार्थ्यांना विविध औद्योगिक व तांत्रिक क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.मोठे व लघुउद्योग या परिसरात उभे राहत असल्याने स्थानिक तरुणांचा रोजगाराचा प्रश्न सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, या संधींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य प्रशिक्षणातच मोठी त्रुटी असल्याचे चित्र समोर आले आहे.
शिवसेना युवा तालुका अधिकारी कौस्तुभ करडे यांनी नुकतीच म्हसळा येथील आय.टी.आय. प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली. या पाहणीत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या असता, गेल्या एक वर्षापासून इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक या महत्त्वाच्या ट्रेडसाठी शिक्षकच नसल्याचे निदर्शनास आले. परिणामी, संबंधित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण अपूर्ण राहिले असून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. एक संपूर्ण वर्ष वाया गेल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या परिस्थितीबाबत खंत व्यक्त करत “या गंभीर दुर्लक्षाला जबाबदार कोण?” असा सवाल कौस्तुभ करडे यांनी उपस्थित केला. लवकरच कौशल्य विकास मंत्र्यांची भेट घेऊन आय.टी.आय. संदर्भातील अडचणी मांडणार असून, सध्याच्या औद्योगिक गरजांनुसार कोणते ट्रेड आवश्यक आहेत, त्या ट्रेडसाठी तातडीने शिक्षकांची नियुक्ती कशी होईल, याबाबत ठोस मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता या प्रश्नावर तात्काळ निर्णय होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी आय.टी.आय. प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तयार करून कौस्तुभ करडे यांच्याकडे सुपूर्द केले. प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके