रसिकांसाठी पर्वणी! अंजली मराठे यांचा विनामूल्य सांगीतिक कार्यक्रम
रायगड, 19 डिसेंबर (हिं.स.)। चित्रपट पार्श्वगायनासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या सुविख्यात गायिका अंजली मराठे यांचा विशेष सांगीतिक कार्यक्रम अलिबागमध्ये आयोजित करण्यात आला आहे. मैफिल अलिबाग या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या का
रसिकांसाठी पर्वणी! अंजली मराठे यांचा विनामूल्य सांगीतिक कार्यक्रम


रायगड, 19 डिसेंबर (हिं.स.)। चित्रपट पार्श्वगायनासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या सुविख्यात गायिका अंजली मराठे यांचा विशेष सांगीतिक कार्यक्रम अलिबागमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

मैफिल अलिबाग या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात त्या रसिकांच्या आठवणीतली, मनाला भिडणारी लोकप्रिय गाणी सादर करणार आहेत. शनिवार, दिनांक २० डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता आरसीएफ वसाहत, कुरूळ येथील आरसीएफ सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

मैफिल अलिबाग संस्थेने गेली तब्बल पस्तीस वर्षे सातत्याने दर्जेदार व अभिरुचीपूर्ण सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कालावधीत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार अलिबागच्या रसिकांसमोर सादर झाले असून, संगीतप्रेमींना अविस्मरणीय अनुभव मिळाला आहे. याच परंपरेत ‘गाणी मनातली’ या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून सरत्या वर्षात आणखी एक सुरेल पर्वणी रसिकांसाठी उपलब्ध होत आहे.

या कार्यक्रमात अंजली मराठे यांच्यासमवेत राम देशपांडे हे हिंदी व मराठी रसिकप्रिय गाणी सादर करणार आहेत. सीओईपी महाविद्यालयाचे अभियांत्रिकी पदवीधर असलेले राम देशपांडे यांनी पं. श्रीकांत ढोकरीकर व पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत व्हावी या उद्देशाने ‘इन्फिनिटी’ या ब्रँडखाली अंजली मराठे व राम देशपांडे ‘सैगल ते अरिजित सिंग’, ‘मौसमे गझल’, ‘तलत मेहमूद स्पेशल’ यांसारखे सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्रम सादर करीत आहेत.

मैफिल अलिबागसाठी खास डिझाइन करण्यात आलेल्या ‘गाणी मनातली’ या कार्यक्रमात केदार परांजपे, सुहास काटदरे, विक्रम भट आणि वासुदेव बापट हे साथसंगत करणार असून, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन सामंत करणार आहेत. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य असून, जास्तीत जास्त संगीतप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन मैफिल अलिबागतर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande