नाशिक : एक वर्षापासून फरार असलेल्या गुन्हेगारास पुण्यातून अटक
नाशिक, 2 डिसेंबर (हिं.स.)। पंचवटी व भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस अंबडच्या गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, ३१ ऑगस्ट २०२४ रोजी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत नानावली येथे मोबाईल माग
एक वर्षापासून फरार असलेल्या गुन्हेगारास पुण्यातून अटक


नाशिक, 2 डिसेंबर (हिं.स.)। पंचवटी व भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस अंबडच्या गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, ३१ ऑगस्ट २०२४ रोजी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत नानावली येथे मोबाईल मागण्याच्या कारणावरुन कुरापत काढून फिर्यादी आकाश युवराज परदेशी (रा. मानूर रोड, नाशिक) याला गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल होता. तसेच २ ऑक्टोबर २०२४ रोजी अनिल सुभाष चव्हाण (रा. मखमलाबाद रोड, क्रांतीनगर) याला कोयत्याचा धाक दाखवून बळजबरीने रिक्षात टाकून धारदार हत्याराने वार करून जिवे मारण्याच्या उद्देशाने जखमी केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

या दोन्ही गंभीर गुन्ह्यांतील आरोपी रोहिदास वामनराव आहेर (वय २५, रा. नवनाथनगर, पेठरोड) हा गुन्ह्यानंतर १ वर्षापासून स्वतःची ओळख लपवून हरसूल (पुणे) येथे रहात होता. आरोपी आहेर हा पुणे येथे फ्लिपकार्ड कंपनीत नोकरी करत असल्याची गुप्त बातमी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलीस हवालदार चव्हाण, भूषण सोनवणे, चारुदत्त निकम यांनी पुणे येथे जाऊन अमनोरा मॉल, हडपसर रोड, पुणे येथे सापळा लावला.

तसेच आरोपीच्या गाडीचा पाठलाग करुन त्याला शिताफिने अटक करण्यात येऊन त्याला पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि जगवेंद्रसिंग राजपूत, पोउनि मोतीलाल पाटील, सुहास क्षिरसागर, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, पोलीस अंमलदार भगवान जाधव, चारुदत्त निकम, महिला पोलीस अंमलदार सविता कदम यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande