
जळगाव, 16 मार्च (हिं.स.) | शहरातील वाल्मीक नगर परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही गटातील युवक तलवारी आणि बेसबॉलच्या दांड्यांसह एकमेकांवर तुटून पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हा वाद महापालिकेतील गटारीच्या कंत्राटावरून निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनावणे यांच्या समर्थकांचा आणि राहुल ठाकरे यांच्या समर्थकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. ही घटना वाल्मिक नगर परिसरात घडली असून रस्त्यावरच दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही जण तलवारी आणि बेसबॉलच्या दांड्यांसह एकमेकांवर हल्ला करत असल्याचे दिसून येते. दरम्यान, यापूर्वी शनिपेठ पोलीस ठाण्यातही या दोन्ही गटांमध्ये वाद झाला होता. त्या घटनेत माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह तीन जणांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली होती.या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई करत दोन्ही गटातील एकूण सात जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर